सांगली महापालिका : स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेची झेप | पुढारी

सांगली महापालिका : स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेची झेप

सांगली; पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सांगली महानगरपालिका देशात 45 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. देशातील 373 महापालिका स्पर्धेत होत्या. सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये महापालिका 22 वी आली आहे.

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनामुळे महानगरपालिका देशातील ‘टॉप 50’ महापालिकामध्ये पोहोचली आहे. या यशामागे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह सर्वच पदाधिकारी, सदस्य तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

भारत सरकारकडून दरवर्षी स्वच्छ सर्र्वेेक्षण अंतर्गत स्पर्धा घेतल्या जातात. केंद्राच्या पथकाद्वारे महापालिका क्षेत्रात आरोग्य, पर्यावरण तसेच स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले जाते. जनतेचा सहभाग आणि ऑनलाईन फीडबॅक यावरही पथकाचे लक्ष असते. स्वच्छ सर्र्वेेक्षण स्पर्धेमध्ये देशातील 373 महानगरपालिका सहभागी झाल्या होत्या. यामधून सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेने 45 वा क्रमांक पटकावला आहे. 2019 मध्ये महापालिका देशात 106 क्रमांकावर होती तर 2020 मध्ये महापालिका 55 क्रमांकावर होती. आयुक्त कापडणीस यांनी विशेष नियोजन केले. याचेच फलित म्हणून ‘टॉप 50’ महापालिकेत सांगलीने प्रवेश केला आहे.

सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमध्येही सांगली महापालिका देशातील 22 व्या क्रमांकावर आली आहे. आरोग्य विभागाचे काम, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिला स्वच्छतागृह, कचरा विलगीकरण, कचरा संकलनसाठी घंटागाडी, कर्मचार्‍यांना सुरक्षेची दिलेली साधने, याचबरोबर सांगली आणि मिरज डेपोमध्ये कचर्‍यावर सुरू असणारी प्रक्रिया, हरित जंगले, मियावकी गार्डन, शहरात स्वच्छतेबाबत केलेेले नियोजन, प्रबोधन, माझी वसुंधरा अभियानातंर्गत केलेल्या कामामुळे महानगरपालिका 45 व्या स्थानावर पोहोचली आहे. अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे आणि टीमने विशेष परिश्रम घेतले.

‘कचरामुक्त’मध्ये गुण कमी; नागरिकांची हवी साथ

कचरामुक्त शहराच्या गुणांकनात सांगली महापालिकेला कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे यापुढे तिन्ही शहरे कचरामुक्त करण्यासाठी प्रशासन अधिक सक्षमतेने काम करणार आहे. कंटेनरमुक्त शहराबरोबर गल्लोगल्ली घंटागाडीतून कचरा गोळा करण्यासाठी अधिक यंत्रणा वाढवली जाणार आहे. कचरा विलगीकरण आणखी प्रभावीपणे राबविले जाणार आहे. नागरिकांनी साथ दिल्यास महापालिका पुढील वर्षीच्या स्पर्धेत ‘टॉप 10’ मध्ये येईल, असा विश्वास आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचलत का?

Back to top button