कोकणातील इंद्रायणी भात दुष्काळी टापूत | पुढारी

कोकणातील इंद्रायणी भात दुष्काळी टापूत

जत : विजय रूपनूर

कोकणातील इंद्रायणी भात आता दुष्काळी टापूत पिकू लागला आहे. सनमडी (ता. जत) येथील हणमंत बिराप्पा धायगुडे यांनी कोकणातील इंद्रायणी या भाताच्या वाणांची शेती यशस्वी करून दाखवली आहे.

कोकणातील शेती म्हणजे तांदळाचे आगार. देशात सर्वत्रच कोकणच्या तांदळाला मोठी मागणी आहे. धायगुडे यांनी कोकणातील इंद्रायणी या वाणांची लागवड केली. कोकणात डोंगरातून निचरा होऊन झिरपणार्‍या पाण्यावर भातशेती केली जाते, त्याच प्रकारे धायगुडे यांनी एक एकर क्षेत्रात भात लागवड केली. कोकणासारखी भात शेती त्यांनी दुष्काळी ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवली. धायगुडे यांनी जमिनीची ठेवण चांगली बनवल्याने त्यांना भातपिकाचे चांगले उत्पादन मिळाले आहे

. धायगुडे हे पाचसहा वर्षांपासून बाजारी, तूर, ज्वारी आदी पिके घेतात. परंतु जत भागात गेल्या दोन – तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत आहे. कृष्णा म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कालव्यातून घोलेश्वर, सनमडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. दोन वर्षात पावसाच्या अतीपाण्यामुळे तूर, बाजारी पिक अनेकठिकाणी वाया गेले. याचा धायगुडे यांनाही फटका बसला. त्यामुळे त्यांनी भात शेतीचा निर्णय घेतला. जत दुष्काळी व दमट भागात इंद्रायणी भाताची लागवड केल्याने अनेकांनी त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र याची तमा न बाळगता त्यांनी जिद्दीने इंद्रायणी भाताचे मोठे उत्पादन घेतले. आता ते इतर शेतकर्‍यांना यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

धायगुडे हे उच्चशिक्षित आहेत. शेतात सातत्याने वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. योग्य नियोजन केल्यास कोकणात पिकणारा उच्च प्रतीचा इंंद्रायणी तांदूळ जत तालुक्याच्या पूर्व भागातसुद्धा चांगला पिकवला जाऊ शकतो हे धायगुडे यांनी सिद्ध करून दाखविले.

 

Back to top button