कृषी कायदे रद्द : मोदी झुकले..हा ऐतिहासिक विजय! शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया | पुढारी

कृषी कायदे रद्द : मोदी झुकले..हा ऐतिहासिक विजय! शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी आनंद व्यक्त केला आहे. मोदी झुकले असून हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करून अहंकाराला झुकवले. अन्याविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली हा देशवासीयांचा विजय आहे. या आंदोलनात जे शहीद झाले त्यांच्याप्रति संवेदना आहेत. मोदींना झुकवणारे शेतकरी महान आहेत. ज्याप्रकारे काही गोष्टी समोर आल्या ते पाहता सरकार किती निर्दयी आहे हे कळते. कुठलीही लढाई जिंकण्यासाठी बलिदान द्यावे लागते. ज्या लढायांत लोक शहीद झाले त्या लढाया जिंकल्या गेल्या आहेत, इतिहास आहे. हा लढा शेतकऱ्यांनी लढून जिंकून दाखवला.’

कृषी कायदे रद्द : कुस्ती हरले

शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले, ‘ हे आंदोलन म्हणजे राजकीय कुस्ती होती. ही कुस्ती मोदी हरले आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. त्यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही. हा शेतकऱ्यांचा विजय आहे.’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा दीर्घकाळ लढा सुरू होता. या काळात आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. काही हिंसक घटना घडवून आणल्या. सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून दीर्घकाळ लढा सुरू राहिला. या बहुसंख्य लोकांच्या विरोधात बहुमतावर आधारित सरकार कायदे लादू पाहत होते. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते. ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय. दादागिरी चालत नाही हे दाखवून दिले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे.’

ही सुबुद्धी एक वर्षापूर्वी सुचली असती तर…

खासदार संजय राऊत म्हणाले, ही सुबुद्धी एक वर्षापूर्वी सुचली असती तर लोकांचे जीव वाचले असते. आम्ही संसदेत बोलायचा प्रयत्न केला. आम्ही आंदोलनात सहभागी झालो. मात्र, विरोधकांचे ऐकायचे नाही असे ठरवले होते. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या पराभवाला समोर पाहून हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जगात या आंदोलनाची चर्चा होती. आपले ‘मानवतावादी सरकार’ आपल्या डोळ्यासमोर शेतकरी मरताना पाहत होते. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी म्हणून शेतकऱ्यांना हिणवले. आंदोलनात अतिरेकी घुसले असे भाजपचे नेते खुलेआम बोलत होते. मात्र, शेतकरी अन्नदाता आहे. त्याच्यासमोर तुमची मग्रुरी चालणार नाही हे दाखवून दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button