दहशतवाद : ईशान्येत दहशतवादाचे थैमान | पुढारी

दहशतवाद : ईशान्येत दहशतवादाचे थैमान

- व्ही. के. कौर

मणिपूर भारतीय संघराज्यात सामील झाल्यापासूनच अनेक विद्रोही संघटनांची स्थापना झाली. 1977 ते 1980 या काळात पीपल्स लिबरेशन आर्मी, पीएलए कांगलीपाव आणि कांगलीपाव कम्युनिस्ट पक्ष असे दहशतवादी गट तयार झाले. नुकतेच दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले. ईशान्येकडील राज्यांत दहशतवाद पुन्हा डोके वर काढत असल्याचेच हे संकेत आहेत.

जम्मू-काश्मीर असो वा ईशान्येकडील अशांत राज्ये असोत, दहशतवादाच्या ( दहशतवाद ) विरोधातील लढाईत सुरक्षा दलांच्या अनेक जवानांनी बलिदान दिले आहे आणि दहशतवादामुळे जवानांचे बळी जाण्याच्या घटनांची मालिका थांबताना मात्र दिसत नाही. राष्ट्रीय संरक्षण यज्ञात जवानांच्या आहुती पडल्याने हा यज्ञ महान बनला आहे. ‘त्याग आणि बलिदान काय असते, हे सोन्याच्या थाळीत वाढलेली भिक्षा खाणार्‍यांना समजणार नाही,’ असे विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले होते. मणिपूरच्या चुडाचांदपूर जिल्ह्यात अतिरेक्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या आय. ई. डी. आणि ग्रेनेड हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह पाच जवान शहीद झाले. कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नी अनुजा शुक्ला आणि आठ वर्षांचा मुलगा अबीर त्रिपाठी यांचाही मृत्यू झाला. कर्नल विप्लव त्रिपाठी हे छत्तीसगडमधील रायगड येथील वरिष्ठ पत्रकार सुभाष त्रिपाठी यांचे चिरंजीव होत. त्यांचे आजोबा किशोरी मोहन त्रिपाठी हे घटना समितीचे सदस्य होते. कर्नल विप्लव आपल्या आजोबांनाच आपला आदर्श मानत असत आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच ते लष्करात भरती झाले होते.

दहशतवादाने ( दहशतवाद ) एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत केला. रायगड येथील नागरिकांना विप्लव यांच्या हौतात्म्याविषयी अभिमान आहे; परंतु त्यांच्या डोळ्यांत अश्रूही आहेत. एका आठ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या आईचा काय दोष होता, हा त्यांचा साधा प्रश्न आहे. दहशतवादी संघटनांच्या हाती अशा हल्ल्यांमुळे काहीही लागणार नाही, तरीसुद्धा ते असे हल्ले करून जवानांचे रक्त का सांडत आहेत, या प्रश्नाचे उत्तर सर्वच देशवासीय अनेक वर्षांपासून शोधत आहेत आणि दुसरीकडे तिरंग्यात गुंडाळलेले जवानांचे पार्थिव देह त्यांच्या घरी सातत्याने आणले जात आहेत. ‘जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही,’ हेच वाक्य प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. भारतीय लष्कर आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा हिशेब चुकता करेल, यात काहीच शंका नाही.

या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पीएलए मणिपूर आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट या संघटनांनी घेतली आहे. या दोन्ही संघटनांचा चीनशी संबंध आहे. पीएलएची स्थापना 1978 मध्ये झाली होती. ही एक अत्यंत खतरनाक दहशतवादी ( दहशतवाद ) संघटना असून, चीनकडून या संघटनेला मदत मिळते. चीनकडून मिळणार्‍या शस्त्रास्त्रांच्या बळावर पीएलए ईशान्य भारतात दहशत पसरवू पाहत आहे. अनेक हल्ल्यांमध्ये या संघटनेचे नाव समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली. तसे पाहायला गेल्यास मणिपूर हा 21 ऑक्टोबर 1949 मध्ये भारताचा भाग बनला. अर्थात, हिंसक आंदोलनांमुळेच 1972 मध्ये हे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले. मणिपूर भारतीय संघराज्यातील एक राज्य बनल्यापासूनच अनेक विद्रोही संघटनांची स्थापना झाली. हा स्वतंत्र देश बनावा, अशी या संघटनांची मागणी पहिल्यापासूनच राहिली. 1977 ते 1980 या काळात पीपल्स लिबरेशन आर्मी, पीएलए कांगलीपाव आणि कांगलीपाव कम्युनिस्ट पक्ष असे दहशतवादी गट तयार झाले. 8 सप्टेंबर 1980 रोजी मणिपूरमध्ये अशांत क्षेत्राची घोषणा करण्यात आली.

याच वर्षी जानेवारी महिन्यात मणिपूर आणि नागालँडमध्ये सशस्त्र दल विशेषाधिकार अधिनियमाची मुदत वाढविण्यात आली होती. अफस्पा कायदा नागालँडमध्ये अनेक वर्षांपासून लागू आहे. नागालँड या शेजारी राज्यातच नागा राष्ट्रवादाचा उदय होत असल्याचे पाहून मणिपूरमध्येही दहशतवादी ( दहशतवाद ) गट तयार झाले. एनएसपीएनच्या इसाक-मुडवा आणि खापलांग गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव आणखी वाढला. कारण, कुबी आदिवासींनी नागा लोकांची कथित अतिक्रमणे रोखून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दहशतवादी गट तयार झाले. इतरही अनेक जमातींमध्ये असे गट तयार झाले. आदिवासी दहशतवादाचा उदय हा 1990 च्या दशकादरम्यान झालेल्या जातीय हिंसाचाराचाच परिणाम होता. मणिपूरमधील दहशतवादी समूहांकडून पोलिसांना लक्ष्य केले जाते. तसेच मंदिरे, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिकांकडून जबरदस्तीने वसूल केली जाणारी खंडणी हा या दहशतवाद्यांचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. एनएच 39 आणि एनएच 53 या राष्ट्रीय महामार्गांवर या गटांनी अनेक ठिकाणी वसुलीसाठी चौक्या उभारल्या होत्या. सुरक्षा दलांनी विशेष मोहिमा राबवून त्या उद्ध्वस्त केल्या. दोन्ही राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने होणार्‍या आर्थिक नाकेबंदीची झळ ईशान्येकडील राज्यांनी अनेकदा सहन केली आहे.

आपल्याला एकीकडे काश्मीरमध्ये दहशतवादाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे सुरक्षा दलांना ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेल्या दहशतवादी ( दहशतवाद ) गटांशीही लढावे लागत आहे. सुरक्षा दलांचा तिसरा महत्त्वपूर्ण संघर्ष आहे, तो देशातील नक्षलवाद्यांशी. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी नुकत्याच झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले. परंतु, ईशान्येकडील राज्यांत मात्र आता दहशतवादी गट पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. त्यांचा सफाया करण्यात सुरक्षा दलांना यशही मिळत आहे; परंतु त्यांच्या घातक हल्ल्यांनाही सुरक्षा रक्षक बळी पडत आहेत. देशात अनेक ठिकाणी दहशतीचे सावट आहे, हे भीषण वास्तव आहे. देशाच्या बाहेरील शत्रूशी मुकाबला करणे एकवेळ सोपे आहे; परंतु देशांतर्गत दहशतवादाचा मुकाबला करणे सोपे नसते. आव्हाने असंख्य आहेत; परंतु सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला लोकांनी आणि समाजानेच सामूहिकरीत्या करण्याचा दिवस फार दूर नाही. जवानांचे रक्त सांडलेले देशाला स्वीकारार्ह नाही. कर्नल विप्लव आणि त्यांच्या साथीदारांपुढे देशवासीय नतमस्तक आहेत.

Back to top button