आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांच्या दारात फिरकू नका, धुळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन

Maratha reservation
Maratha reservation
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजातील आमच्या बापजाद्यांनी महाराष्ट्रात अनेक नेत्यांना मोठे केले. या नेत्यांची मुले भय्यासाहेब बनवून श्रीमंत झाली. पण आमचा मुलगा आजही उसाच्या शेतात राबतो. त्यामुळे यापुढील काळात मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या मागे जाणे थांबवले पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या नेत्यांच्या मागे जाणार नाही, अशी भूमिका घेण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता, धनगर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हानदेखील त्यांनी दिले.

धुळ्यातील जेलरोड येथे मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी असताना मृत झालेले राजाराम वालजी पाटील यांच्या परिवाराला एक लाखाच्या मदतीचा धनादेश धुळ्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी पाटील यांचे चिरंजीव अभिनय पाटील यांनी बोलताना, आपण वडिलांच्या बलिदानापासून प्रेरणा घेतली असून, पुढील काळात समाजासाठी तन, मन, धन अर्पण करणार असल्याचे सांगितले. या वाक्याचा धागा पकडत मनोज जरांगे-पाटील यांनी, मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी बळी दिला आहे. अजून सरकार किती बळींची वाट पाहात आहेत, असा सवाल केला. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांना पाटील परिवारासंदर्भात माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण आज खानदेशचा दौरा सुरू केला. चाळीसगावपासून धुळ्याकडे येत असताना आजूबाजूची शेती पाहिली. या शेतीची अवस्था पाहून मराठवाड्याप्रमाणेच येथील शेतकरी हवालदिल असल्याचे दिसून आले. शेतकरी अशा पद्धतीने संकटात असताना त्यांचे नेते कुठे गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या नेत्यांना जातीयवाद करायला वेळ आहे. समाजात 80 टक्के मराठा समाजाचे शेतकरी आहेत. हा शेतकरी समाजाला पोटभर अन्न देतो, तरीही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या नेत्यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.

राज्यभरामध्ये 32 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या संदर्भातला अहवाल शासनाला गेल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कायदेशीर आरक्षण देण्यासाठी कुणीही थांबवू शकत नाही. याला एक नेता अपवाद सोडला, तर मराठा आरक्षणासोबत ओबीसी समाज आहे. आता याला विरोध करणाऱ्या नेत्याने ओबीसी प्रवर्गात वेगळा प्रवर्ग असणाऱ्या धनगर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान जरांगे-पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता यावेळी दिले.

ओबीसी-मराठा एकत्र

रविवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता कन्नड तालुक्यात एक फलक फाडण्यात आला. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून एका पोलिस अधिकाऱ्याने भ्रमणध्वनीवरून मला माहिती दिली. मीदेखील तातडीने संपर्क साधून मराठा तरुणांना कोणतेही चुकीचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. त्यामुळे सर्व तरुण शांतता राखत घरी परतले. राज्यातील सर्व भागांत ओबीसी आणि मराठा समाज एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला.

मंडळावर नातेवाइकाची वर्णी

बीडमधील हॉटेल या नेत्याच्या नातेवाइकाचे असून त्यांनीच ते जाळले. ओबीसी महामंडळावर त्यांचा नातेवाईक बसवला. 80 टक्के लाभ एकट्याने खाल्ला. उर्वरित 20 टक्क्यांमधील 300 जातींना लाभ मिळाला नाही. या नेत्याने ओबीसींमध्ये असलेल्या छोट्या जातींना कोणताही फायदा होऊ दिला नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news