CBI टीमवर जमावाचा हल्ला; स्थानिक पोलिसांनी केली सुटका | पुढारी

CBI टीमवर जमावाचा हल्ला; स्थानिक पोलिसांनी केली सुटका

भुवनेश्वर, पुढारी ऑनलाईन

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या CBI टीमवर ओडिशामध्ये जमावाने हल्ला केला असून स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका केली.

चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी सीबीआयने CBI मंगळवारी उत्तर प्रदेश आणि ओडिशासह १४ राज्यांमध्ये ७७ ठिकाणी छापे मारले. या प्रकरणाचा तपास करण्यास गेलेल्या एका टीमवर जमावाने हल्ला केला. या टीमने सकाळी सात वाजता ढेंकनल येथील सुरेंद्र नायक याच्या घऱावर छापा टाकला. सकाळपासून दुपारपर्यंत ही टीम नायकच्या घरी तपास करत होती. दरम्यान त्याच्या घरासमोर मोठा जमाव जमला होता. त्यांनी काही वेळाने घरात घुसून अधिकाऱ्यांना बाहेर खेचत आणले आणि त्यांना जबर मारहाण केली.

सीबीआयच्या वेगवेगळ्या टीमने उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत छापे टाकले आहेत. नोएडा, गाजियाबाद या मोठ्या शहारांतही छापे टाकले असून राजस्थानमधील नागौर, जयपूर, अजमेर तर तामिळनाडूमधील कोईम्बतूरमध्येही छापे टाकले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयची एक टीम ओडिशात गेली होती. त्यांनी छापा टाकल्याचे वृत्त समजताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने नायक याच्या घरासमोर जमले. हातामध्ये काठ्या घेत हे नागरिक आक्रमक झाले. त्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना घेरत जाब विचारला. त्यानंतर त्यांना जबर मारहाण केली. सीबीआय अधिकाऱ्यांना सुरेंद्र नायकच्या घरातून खेचत बाहेर आणले. मारहाण सुरु असताना स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली.

चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी देशभरात ८३ गुन्हे: CBI चे छापे

सीबीआयने १४ नोव्हेंबर रोजी चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीत १९, उत्तर प्रदेशमधील विविध शहरांत ११, आंध्र प्रदेशात २ शहरांत , गुजरातमधील ३ शहरांत, पंजाबमधील ४ शहरांत , बिहारमधील २, हरियाणात ४ ठिकाणी, ओडिशात ३ शहरांत तर तामिळनाडूमधील ५ शहरांत छापे टाकले आहेत. राजस्थानमधील मोठ्या ४ शहरांत, महाराष्ट्रात ३ ठिकाणी, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एका ठिकाणी छापा टाकला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button