शरद पवार : आम्ही जुळवून घेतले, त्यांनी दिवस मोजावे! | पुढारी

शरद पवार : आम्ही जुळवून घेतले, त्यांनी दिवस मोजावे!

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येकात गुण-दोष असतातच. आम्ही जुळवून घेतले आहे. त्यानुसार पुढे जाण्याचे ठरविले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य चालावे, असे तिन्ही पक्षांना वाटते. सरकार जाईल, अशी पहिल्या दिवसापासून चर्चा सुरू असून, पूर्ण पाच वर्षे अशीच चर्चा सुरू राहणार आहे, त्यांंनी दिवस मोजत राहावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी भाजपच्या नेत्यांना लगावला.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, कोणा नेत्याला पर्याय नाही, अशी स्थिती लोकशाहीत असूच शकत नाही. पर्याय उपलब्ध असतोच. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा लोक त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहतात. आताही देश चालवण्याची क्षमता असलेले विरोधकांत अनेक लोक आहेत. आपल्याला त्याची अजिबात चिंता वाटत नाही. लोकच पर्याय देतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे पर्याय उभा राहू शकतो, याचे अप्रत्यक्षरीत्या सूतोवाच केले.

‘केंद्रात विरोधकांमध्ये सक्षम पर्याय नाही का,’ या प्रश्नाला उत्तर देताना खा. पवार म्हणाले, 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींविरोधात देशात सक्षम नेता कोणी नव्हता. निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्याआधी मोरारजीभाईंनी नेतृत्व करावे, असा विचारही कोणाच्या डोक्यात आला नव्हता. जयप्रकाश नारायण यांनी आवाहन केले आणि सबंध देश उभा राहिला. तेव्हा कोणी एक व्यक्ती नव्हती, अनेक लोक होते. शेवटी जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा लोकांमधून व्यक्ती पुढे येते किंवा लोक स्वत:च त्या व्यक्तीला पुढे करतात. आताही लोक योग्य व्यक्तीच्या मागे उभे राहून पर्याय देतील.

महाराष्ट्रातील हिंसाचाराबद्दल पवार यांनी सांगितले की, त्रिपुरामध्ये एका वाहनाला आग लावलेले द़ृश्य मी बघितले. तिथे काही तरी घडले म्हणून महाराष्ट्रात काही घडायला पाहिजे, असे नाही. राज्य शांतपणे वाटचाल करीत असताना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका राजकीय पक्षाने (भाजपकडे रोख) अमरावती जिल्हा बंदचा निर्णय घेतला. काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य अशा पद्धतीने व्यक्त करीत आहेत. येत्या काळात चार राज्यांत विशेषतः उत्तर प्रदेशात निवडणूक असून, ती देशाच्या उद्याच्या निवडणुकांना दिशा देणारी असल्याने ते डोळ्यासमोर ठेवून ही प्रकरणे घडत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.

सीबीआय, ‘ईडी’च्या कारवायांबद्दल पवार म्हणाले की, काही अधिकार्‍यांमार्फत राज्यातील ठराविक लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छापे हा नित्याचाच भाग झाला आहे. देशाची सत्ता हाती असलेल्यांना काही गोष्टींची पूर्तता करता न आल्याने ते लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार करीत आहेत.

एस.टी. कर्मचार्‍यांनी तुटेपर्यंत ताणू नये

एस.टी. कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत पवार म्हणाले, तुम्ही जेथे नियुक्त झालात, तेथेच तुम्ही थांबायला हवे. तेथून दुसरीकडे वर्ग करा, या मागणीची लगेचच पूर्तता होण्यासारखी नाही. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांनी मार्ग काढला पाहिजे. ताणावे, परंतु ते तुटेपर्यंत ताणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यातील दंगली अन् विक्रम गोखलेंवर निशाणा!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यासारख्या बाबींची नोंदही घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली. दंगलीचा राज्यातील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो की नाही, हे सांगू शकत नाही; पण गोखले यांच्या वक्तव्याचा उद्देश तसाच असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button