शिवशाही म्हणजे बाबासाहेब पुरंदरेच | पुढारी

शिवशाही म्हणजे बाबासाहेब पुरंदरेच

- गजानन मेहेंदळे

आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची लोकांना ओळख आहे ती शिवशाहीर म्हणून. खुद्द बाबासाहेबांनी स्वतःला शाहीर म्हणवून घेतले आहे आणि लोक त्यांना शिवशाहीर म्हणूनच ओळखतात; किंबहुना शिवशाहीर म्हणजे बाबासाहेब असे जणू समीकरणच झाले आहे. पण त्यांची ती ओळख अपुरी आणि काहीशी एकांगी आहे; कारण बाबासाहेब मुळात इतिहास संशोधक आहेत. शिवचरित्राच्या साधनांचा अभ्यास करून त्यांनी शिवचरित्राचे जे शिल्प उभे केले आहे, ते इतके विलोभनीय आहे की, ते पाहताना आपण इतिहास वाचतो आहोत की काव्य वाचतो आहोत, असा संभ्रम कोणालाही पडेल. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर ते ऐतिहासिक काव्य आहे किंवा काव्यरूप इतिहास आहे.

बाबासाहेबांचे शिक्षणच मुळी भारत इतिहास संशोधक मंडळ या विख्यात ज्ञानपीठात झाले आहे आणि तेही गणेश हरी खरे व शंकर नारायण जोशी यांच्यासारख्या इतिहासमहर्षींजवळ बसून. पुढे बाबासाहेबांनी त्यांच्याबरोबर बसून त्यांचे सहकारी म्हणून त्या ज्ञानपीठात इतिहास संशोधनाही केले. बाबासाहेब हे त्या ज्ञानपीठात पैलू पडून तयार झालेले रत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख महाराष्ट्राला पूर्वीपासून होतीच. पण महाराजांच्या चरित्रातील बारीक-सारीक तपशील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय बाबासाहेबांना आहे. मंत्रमुग्ध करणार्‍या त्या चरित्रामुळे घडले असे की, बाबासाहेब हे प्रथम इतिहास संशोधक आहेत; मग शिवशाहीर आहेत, याचा बर्‍याच जणांना विसर पडला आहे. पण त्यांची पहिली ओळख आहे ती इतिहास संशोधक म्हणूनच.

Back to top button