लवकरच राज्यातील अनेक मोठ्या चेहऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : नाना पटोले

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. तसेच येत्या काळात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राज्यातील अनेक मोठ्या चेहऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आणि ऐन दिवाळीच्या धामधुमीत या निमित्ताने त्यांच्या विरोधी गोटात राजकीय फटाके उडवले.

काँग्रेस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी नाना पटोले दिल्लीत होते. या कार्यक्रमात पाच राज्याच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा झाली, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते या पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशीही माहीती त्यांनी दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सरकार महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवत आहे. महाराष्ट्रातील हिरे व्यापार देखील गुजरातला गेला आहे. एक प्रकारे महाराष्ट्र लुटून सुरतेला दिले जात आहे, अशी परिस्थिती राज्यात आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने आता महाराष्ट्राची ओळख बेरोजगारांचा महाराष्ट्र अशी झाली आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली.

गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांमधील झालेल्या भेटीवर बोलताना, अजित पवारांचा आम्हाला चांगला अभ्यास आहे. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. अजित पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही म्हणत त्यांनी शरद पवार अजित पवार भेटीवर बोलणे टाळले.

दरम्यान, राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाबद्दल बोलताना भाजप जातीनिहाय जनगणना करत नाही मात्र विविध जातींना गरीब करत आहे तर राहुल गांधी जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. जे प्रश्न घेऊन केंद्रातील आणि राज्यातील सरकार सत्तेवर आले त्या प्रश्नांना बगल देण्यासाठी हा संघर्ष लावला जात आहे. असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news