कोल्हापूर विधान परिषद : ‘टोकन’सह सहलीचे बुकिंग सुरू | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद : ‘टोकन’सह सहलीचे बुकिंग सुरू

कोल्हापूर : विकास कांबळे

गेल्या काही दिवसांपर्यंत एकतर्फी वाटणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडणूक जाहीर होताच ‘एकतर्फी’ शब्दाची जागा रंगतदार शब्दाने घेतली आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित होण्याअगोदरच मतदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. सहलीला पाठविण्यात येणार्‍या ठिकाणांचे बुकिंग करण्यात येऊ लागले आहे. ज्यांना महिनाभर वेळ आहे, त्या मतदारांच्या दारात आतापासूनच वाहने उभी राहू लागली आहेत. त्यासाठी ‘टोकन’ही देण्यास सुरुवात झाली आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. दोन्हीकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. मतदार मर्यादित असल्यामुळे दिवाळीपासूनच मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने उमेदवारांकडून भेटवस्तू पोहोच करण्यात आल्या आहेत. निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात पुन्हा महाडिकच असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढणार आहे.

मर्यादित मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे उमेदवारांकडून अतिशय सावधानता बाळगली जाते. आपला मतदार विरोधकांच्या संपर्कात येणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. त्यासाठी मतदारांना थेट सहलीवर पाठविले जाते. परंतु; आठ ते पंधरा दिवस अगोदर त्याची तयारी केली जाते. यावेळी मात्र आतापासूनच सहलीचे नियोजन करण्यात येऊ लागले आहे.

ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांना महिनाभर सहलीवर जायचे आहे त्यांच्यासाठी उमेदवारांच्या वतीने वाहने तयार ठेवली आहेत. या वाहनांमध्ये मतदार आता बसू लागले आहे. आतापासून सहलीवर जाणार्‍या मतदारांना ‘टोकन’ही देण्यास सुरुवात केली आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

सहलीची ठिकाणे निश्चित

मतदानाला अद्याप जवळपास महिना आहे. गेल्यावेळी विधान परिषदेची कोल्हापुरातील निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली होती. यावेळची निवडणूक देखील त्याच दिशेने जाऊ लागली आहे. त्यामुळे कोणताही धोका होऊ नये म्हणून मतदारांना सहलीवर पाठविण्याची ठिकाणे निश्चित करण्यात येऊ लागली आहेत.

पहा व्हिडिओ.

Back to top button