पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला गांभीर्य असते, तर आजचा ४१ वा दिवस उजाडला नसता. सरकारने ४० दिवसांची मुदत घेतली होती. आम्ही ४० दिवस सरकारच्या निर्णयाची वाट पाहिली. मात्र आज ४१ वा दिवस आहे. आजपासून पुन्हा आंदोलन करणार, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल करत, जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीने मार्ग काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली.
जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला दिलेला अल्टिमेटम मंगळवारी (दि.२४) संपत. आजपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जरांगे-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार, असे शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या शपथेचा सन्मान करतो, मात्र आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली. सरकारकडून आपल्याशी अद्याप संपर्क केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना गोरगरिबांची काळजी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नसल्याची टीका त्यांनी केली. ४० दिवस दिले सरकारन आरक्षणावर काय काम केलं? असा प्रश्न उपस्थित करत, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याच ते म्हणाले.
मराठा आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखतंय. मराठा आरक्षणात कोण खोडा घालतंय, म्हणत मनोज जरांगे यांनी ज्यांना मराठा आरक्षण नको त्यांनी ते घेउ नये. काही नेते उगाच बरळतात, असा टाेलाही जरांगे-पाटील यांनी नारायण राणेंना लगावला.