आत्महत्या करणार असाल तर….एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे म्हणाले… | पुढारी

आत्महत्या करणार असाल तर....एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे म्हणाले...

मुंबई, पुढारी ऑनलाईन

आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करणार नाही, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे यांनी फटकारले. तसेच असे करणार नसाल तरच मी यात सहभाग घेईन, असे मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले.

‘काम नसेल तर दाम पण नाही’ असा इशारा देत परिवहनमंत्री अध्यक्ष अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, जोपर्यंत एसटीचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेत कर्मचारी आहेत. गेली दोन आठवडे सुरू असलेला हा संप आणखी चिघळू नये, यासाठी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, एका निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान चर्चेला सुरवात करण्याआधी राज ठाकरे यांनी, कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्या करू नये अशी अट घातली.

आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांची चिंता व्यक्त करून राज ठाकरेंनी बैठकीच्या सुरवातीलाच आपली चिंता व्यक्त केली. “ कर्मचाऱ्यांनी आधी आत्महत्या करणे थांबवावे: कारण आपण आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही अशा स्पष्ट शब्दांत सुनावले,

…बायका पोरांना काय सांगायचं?

या बैठकीतील चर्चेदरम्यान आपली कैफीयत मांडताना एस टी कर्मचारी मंडळातील सदस्यांनी, आम्ही सर्वजण महाराष्ट्राची आहोरात्र सेवा करतोय. तरीही आमचे पगार देतानाच शासनाकडे पैसे कसे नसतात असा प्रश्न उपस्थित केला. 12 दिवस सुरू असलेल्या संपाची दखल घेवून विलिनीकरण समिती स्थापन झाली आहे. याबाबत कोर्टांची पुढील तारीख आल्यावर हाती काही लागलंच नाही तर आम्ही आमच्या बायका-पोरांना काय सांगायचं? असा प्रश्न उपस्थित केला.

… नाहीतर ३१७ जण आत्महत्या होतील

आत्तापर्यंत 37 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याची दखल घेवून, सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडून अर्थसंकल्पात तरतूद करावी. यापुढे कर्मचाऱ्यांना वेळेत पगार झाला नाही आणि अन्याय झाला तर ३७ ऐवजी ३१७ जण आत्महत्या करतील अशी भिती अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसमोर व्यक्त केली.

तीन आठवडे नाही तर एक महिना घ्यायला तयार

12 दिवस विना पगाराचे बसून रहावं लागलं आहे. विलिनीकरणाबाबत न्यायालयात तारखा होतील पण अपेक्षीत असे काही घडलेच नाही तर काय ? असा प्रश्न उपस्थित करत शासनाने तत्काळ आयोग लागू करून नंतर विलिनीकरणाची पक्रिया पार पाडावी अशी मागणी केली. एसटीच्या विलिनीकरणाबाबत सरकारने तीन आठवडे वेळ मागितलाय, मात्र आम्ही एक महिना द्यायला तयार आहेत असेही स्पष्ट केले.

यंदा आमच्या घरी दिवाळीच झाली नाही…

संपूर्ण राज्यात दिवाळी साजरी होत असताना एकाही एसटी कर्मचाऱ्याच्या घरी दिवाळीचा सण साजरा झाला नाही. सर्वजण दारात बसून होतो. साहेब आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता अशी विनवणी सदस्यांनी यावेळी केली. येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडून तो केंद्राकडे पाठवावा. आणि जोपर्यंत विलनीकरणाची प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

Back to top button