नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड शी संबंध; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप | पुढारी

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड शी संबंध; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई, पुढारी ऑनलाईन

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड शी संबध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला (नवाब मलिक अंडरवर्ल्ड संबंध). ‘मुबंई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदच्या जवळच्या माणसाकडून नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाने कवडीमोल दराने जागा खरेदी केली आहे. या प्रकरणातील दोन्ही व्यक्ती या टाडाखाली अटकेत होत्या. तरीही मलिक यांनी त्यांच्याशी व्यवहार केले. यावरून मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात भाजपवर आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बाँम्ब फोडू, असा इशारा दिला होता. फडणवीस यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले.

ते म्हणाले, मी कुठला सलीम जावेदचा सिनेमा सांगणार नाही. हा राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी प्रश्न आहे. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट झाला. शहरात रक्ताचा सडा पडला होता. या प्रकरणात सरदार शहावली खान हा आरोपी आहे. त्याला टाडाअंतर्गत अटक केली. तो टायगर मेननच्या नेतृत्वाखाली काम करत होता. त्याने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि महापालिकेच्या इमारतीत रेकी केली होती. त्याने आरडीएक्स भरून बॉम्ब ठेवले होते. हा या प्रकरणातील पहिला माणूस आहे.

नवाब मलिक अंडरवर्ल्ड संबंध : सलीम दाऊदचा माणूस

दुसरा माणूस आहे. सलीम पटेल. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना एका इफ्तार पार्टीत ते गेले आणि दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो छापून आला. त्यात आर. आर. पाटील यांची काहीच चूक नव्हती. मात्र, फोटो छापून आलेली व्यक्ती सलीम पटेल होती. सलीम हा दाऊदचा माणूस होता. दाऊद फरार झाल्यानंतर तो हसीना पारकरसोबत काम करत होता. तो तिचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड होता. २००७ मध्ये त्याला अटक झाली होती. हा या प्रकरणातील दुसरा व्यक्ती आहे. या दोन व्यक्तींसोबत फराज मलिक यांनी व्यवहार केला आहे. मलिक यांनी कुर्ला येथील गोवावाला कॉम्प्लेक्समधील २ एकर ८० एकर जमीन विकत घेतली आहे. या जमिनीचे मूल्य कोट्यवधी रुपयांची आहे. ती केवळ ३० लाखांना विकत घेतली आहे. हा मुद्दा सुरू झाला तेव्हा मलिक मंत्री होते. त्यांना खान आणि पटेल कोण आहेत हे माहीत होते. मुंबई बॉम्बस्फोटाशी संबधित व्यक्तीशी व्यवहार केलाच कसा? असा आमचा सवाल आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘दोन्ही आरोपी टाडांअंतर्गत आरोपी होते. टाडाच्या आरोपींची सगळी संपत्ती सरकार जप्त करते. ही संपत्ती जप्त करू नये यासाठी अल्प किमतीत ही जमीन विकत घेतली.’

नवाब मलिक अंडरवर्ल्ड संबंध : शरद पवार यांना कागदपत्रे देणार

ज्या आरोपींमुळे शहरात रक्तपात झाला. लोकांचे जीव गेले. त्या आरोपींशी मलिक यांनी व्यवहार केले. या व्यवहारासंबंधी कागदपत्रे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार आहे. त्यांना कळू द्या त्यांचे मंत्री कसे व्यवहार करतात. काय कांड करतात हे त्यांना कळले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button