अफगाणिस्तानच्या पराभवानंतर विराट कोहली याचे ट्विट व्हायरल | पुढारी

अफगाणिस्तानच्या पराभवानंतर विराट कोहली याचे ट्विट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर रविवारी न्यूझीलंड क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 चा एक अतिशय महत्त्वाचा सामना झाला. अफगाणिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसोबतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्याही या सामन्याकडे लक्ष लागले होते. कालच्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला असता तर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. पण तसं झालं नाही. कालच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानचा 11 चेंडू राखून आठ गडी राखून पराभव केला. यानंतर विराट कोहली याचे ट्विट व्हायरल झाले आहे.

या विजयासह ब गटातील दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील याचाही निकाल समोर आला आहे. त्याचबरोबर या पराभवानंतर भारतीय संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले आहे. विराट सेना T20 विश्वचषक 2021 च्या ‘सुपर 12’ सामन्यांमधून बाहेर पडल्यानंतर कॅप्टन कोहली याचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर त्याने हे ट्विट 20 मार्च 2012 मध्ये आशिया कप दरम्यान केले होते. ‘उद्या घरी जात आहे, बरं वाटत नाही.’ अस ट्विटमध्ये विराट कोहली याने लिहिले आहे.

ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाचा अजून एक सामना बाकी आहे, पण हा सामना फक्त औपचारिक सामना राहिला आहे. भारतीय संघाने आज नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाही. कारण ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने अनुक्रमे 10 आणि 8 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तरी केवळ सहा गुणच होतील.

हेही वाचलत का?

Back to top button