ठाकरे सरकार सुद्धा इंधन करात कपात करणार का?; किरीट सोमय्यांचा सवाल | पुढारी

ठाकरे सरकार सुद्धा इंधन करात कपात करणार का?; किरीट सोमय्यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. ही कपात पेट्रोलवरती ५ रुपये तर डिझेलवर १० रुपयांनी केली आहे. ही कपात रात्री बारा वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. आता यावरती भाजप व राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरु आहे. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

”महाराष्ट्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलवर ₹ 29.25 एवढी कर आकारणी करत आहे व केंद्र सरकार ₹32.90 एवढी कर आकारणी करते. जर केंद्र सरकारने पेट्रोल/ डिझेल वरील करामध्ये कपात केली आहे तर आता ठाकरे सरकार सुद्धा करात कपात करणार का?” असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ५ आणि १० रुपये एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आजपासून ही कपात लागू झाली आहे. केंद्र सरकारकडून एक्साईज ड़्युटी कपात करण्यात आल्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट कमी करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी केली भाजपवर टीका

इंधन दर कपातीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. “राज्य सरकार दर वाढवत नाही. राज्य सरकार या महागाईविरोधात आहे. पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करून काय होणार? किमान २५ रुपयांनी कमी करायला हवे होते. १०० रुपये वाढवायचे आणि त्यातील ५ रुपये कमी करायचे ही खेळी आहे. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे. इंधन दरवाढीतून कोट्यवधी रुपये कमविले”, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्रावर केली.

संजय राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, “केंद्र सरकारचे मन मोठं नाही तर सडकं आहे. गेल्या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून केंद्रानं बेहिशोबी मालमत्ता कमवली.” पेट्रोल दरामध्ये तुटपुंजी कपात केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोदी सरकारवर टीका केली जात आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचीही टीका

“सणासुदीचे दिवस सुरू आहेत. पण, सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. भाजप सरकारच्या लुटण्याचा या विचारवृत्तीमुळे सणापूर्वीच महागाई कमी करायचे सोडून गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, किराणामालाचे दर आकाशाची उंची गाठत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप १-२ रुपयांनी दर कमी करता, लोक तुम्हाला उत्तरे मागतील. सामान्य जनता तुम्हाला माफ करणार नाही. इंधन दर कपातीचा निर्यण मनापासून नाही तर भीतीतून घेण्यात आला आहे. या सरकारला निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल”, अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button