अनिल देशमुख यांची दिवाळी ईडीसोबत | पुढारी

अनिल देशमुख यांची दिवाळी ईडीसोबत

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मनी लाँडरिंगप्रकरणी अटक झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी 6 नोव्हेंबरपर्यंत सक्‍तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी देशमुख सोमवारी स्वतःच ईडीसमोर हजर झाले. तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर रात्री सव्वा एकच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. अप्पर सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर हजर करत ईडीतर्फे अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी देशमुख यांची 14 दिवसांची कोठडी मागितली होती.

मात्र ईडीची ही मागणी फेटाळत फक्‍त चार दिवसांची कोठडी दिली त्यातही न्यायालयाने देशमुख यांना दिलासा देत घरचे जेवण, औषधे आणि वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे. देशमुख यांच्यावतीने अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली.

देशमुख हे 71 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृतीस्वास्थ्य ठीक नसते. तसेच त्यांना अनेक आजार आहेत. ते चौकशीला सहकार्य करतील. त्यांना ‘ईडी’ कोठडी देण्यात येऊ नये, असा युक्‍तिवाद या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ‘ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. परिणामी देशमुखांची दिवाळी ‘ईडी’ कोठडीत जाणार आहे.

अनिल देशमुख यांची ‘ईडी’ कोठडीमध्ये जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी विशिष्ट अंतरावर त्यांच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी तसेच देशमुख यांना घरचे जेवण आणि औषधे पुरवण्यात यावीत, अशी विनंती करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले. हे दोन्ही अर्ज मंजूर केले.

अनिल देशमुख यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा आधार घेत आणि सचिन वाझेचा जबाब नोंदविल्यानंतर बनावट कंपन्यांचा आरोप करून ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. जेव्हा अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर गृह मंत्रालय आणि देशमुख यांना परमबीर सिंग यांचा त्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आल्याने त्यावेळी सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी बदला घेण्याच्या भावनेतून देशमुख यांच्याविरोधात पत्र लिहिल्याचा दावा वकील इंद्रपाल सिंह यांनी केला.

‘ईडी’कडे आम्ही कलम 15 अंतर्गत आमचा जबाब नोंदवला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याची भेट घेतली नाही. त्याला कधी फोन केलेला नाही. कुठलेही निर्देश किंवा आदेश गृह मंत्रालय किंवा अनिल देशमुख यांच्याकडून सचिन वाझे याला देण्यात आले नाहीत. सचिन वाझे करत असलेला आरोप खोटा आहे, असे वकील इंद्रपाल सिंह यांचे म्हणणे आहे. तसेच परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगाकडे कोणतेही पुरावे नसल्याचे प्रतिज्ञापत्र देत ती केस बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे आरोप तथ्यहीन असल्याचा दावासुद्धा वकील इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेथे आम्हाला आरोपी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे देशमुख ‘ईडी’च्या कार्यालयात हजर झाले. अनिल देशमुख यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली नव्हती. असेही वकील इंद्रपाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button