कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवे; हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केली भूमिका - पुढारी

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवे; हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केली भूमिका

नगर : पुढारी वृत्तसेवा

निवडणुकांचा काळ असल्याने नगरऐवजी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवे, असे म्हटले होते. याचा अर्थ वेगळा काढला गेला, असे स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिले.

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. नगरसह कोल्हापूरमध्येही विधान परिषद निवडणूक आहे. माझ्या मतदारसंघातील पालिका, कारखाने यासह कोल्हापूर मनपाचीही निवडणूक आहे. नगरमध्येही अशाच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी कोल्हापूर व नगर या दोन्ही ठिकाणी वेळ देणे अडचणीचे ठरेल. केवळ एवढ्याच कारणासाठी पक्षांतर्गत चर्चेमध्ये मी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाबाबत भाष्य केले होते. मात्र याचा अर्थ नगरचे पालकमंत्रिपद नकोय, असा होत नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबाबत निर्णय घेतील व तो मान्यच असेल, असे स्पष्टीकरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

नगर येथील पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी नगरचे पालकमंत्रिपद सोडण्याबाबत सुरू झालेल्या चर्चांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी विरोधी भाजपवरही टीकास्त्र सोडले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, नोव्हेंबरच्या दरम्यान विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यासह राज्यात, विशेषतः नगर व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात कारखाने, पालिका, महापालिकांच्याही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वेळ देण्यात अडचणी येऊ शकतात.

काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत बैठकीत अनौपचारिकपणे या विषयावर चर्चा झाली होती. त्यातून एवढी चर्चा जोर धरेल, असे वाटले नव्हते. मात्र, यासंदर्भात माझे मत मी मांडलेले आहे. पक्षाध्यक्ष पवार व मुख्यमंत्री ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवंय, याचा अर्थ नगरचे नको, असा होत नाही. पक्षाने नगरची जबाबदारी कायम ठेवल्यास ती मी पार पाडणारच आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण करण्यासारखे काहीच नाही. तसेच नगरचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडत नाही, म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. तो कधीच यशस्वी होणार नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठस्तरीय सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना नगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button