खंबाटकी घाटात २५ वर्षीय महिलेला जाळले? पोलिसांना लागेन थांगपत्ता | पुढारी

खंबाटकी घाटात २५ वर्षीय महिलेला जाळले? पोलिसांना लागेन थांगपत्ता

सातारा : विठ्ठल हेंद्रे

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात 4 महिन्यांपूर्वी अंदाजे 25 वर्षीय महिलेची अर्धवट जळालेली बॉडी सापडल्यानंतर अद्याप त्याचा तपास लागलेला (अनडिटेक्ट) नाही ( खंबाटकी घाटात महिलेला जाळले ). संबंधित महिलेच्या हातावर ‘अफान’ असे इंग्रजीमध्ये टॅटू काढलेला आहे. दरम्यान, सातारा पोलिस या घटनेचा शोध कधी घेणार? ती महिला कोण? तिचे मारेकरी कोण? असे अनेक सवाल निर्माण झालेे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 16 जून 2021 रोजी अनोळखी महिलेचा खून करुन तिचा मृतदेह खंबाटकी घाटात रस्त्यालगत सापडला. मध्यरात्री ही घटना घडल्याची शक्यता आहे. सकाळी या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसर हादरुन गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक खंडाळा पोलिस, एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी गेले. त्यांनी घटनास्थळ पिंजून काढल्यानंतरही त्यांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटली नाही.

मृत महिलेच्या वर्णनाबाबतची सर्व माहिती प्रसिध्दी माध्यमे, सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आली. तसेच राज्यातील बेपत्ता व्यक्‍तींची माहिती घेवून ‘सीसीटीएनएस’ वरही पोलिसांनी शोध घेतला. मात्र त्यातही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. महामार्गावर ओपन रस्त्यालगत महिलेला जाळून तिचा खून करुन मृतदेह अशा पध्दतीने टाकल्याने पोलिसांनी सर्व शक्यतेने तपास केला. मात्र अद्यापपर्यंत या घटनेचा शोध लागला नसून ‘अफान’ नेमकी कोण? तिचे खरे नाव अफान आहे की अन्य काही? तिचे मारेकरी कोण? तिला कुठे जाळले? खूनाचे कारण काय? असे अनेक सवाल उपस्थित झाले असून पोलिस याचा तपास कधी करणार? याकडे लक्ष लागले आहे.

खंबाटकी घाटात महिलेला जाळले : ओळख पटली तर संपर्क साधा…

चार महिन्यांपूर्वी सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाबाबत खंडाळा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता अंदाजे 20 ते 28 वय आहे. उंची 5 फूट 2 इंच आहे. अंगात अर्धवट जळालेली काळ्या रंगाची लेगीन पॅन्ट व चित्त्याच्या कातडीच्या डिझाईनसारखा टॉप आहे. डाव्या हाताच्या मनगटाजवळ बदाम व अस्पष्ट अशी इंग्रजी अक्षरे गोंदलेला टॅटू आहे. पोलिसांनी ते वाचण्याचा प्रयत्न केला असता मराठीमध्ये ‘अफान’ असा त्याचा उल्‍लेख होत आहे. दोन्ही पायात पांढर्‍या धातूचे पैंजण व जोडवी घातलेली आहेत. असे वर्णन असून याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घाट… सातारा… सेफ एरिया…

सातारा जिल्ह्यात अनेक घाट आहेत. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुनसान घाट या गुन्हेगारांसाठी सेफ एरीया बनल्याचे यापूर्वीही वेळोवेळी समोर आले आहे. अलीकडच्या घटनांमध्ये वाई तालुक्यात व मार्ली घाटात असे अनेकदा मृतदेहाचे सांगाडे सापडले आहेत. प्रामुख्याने बेपत्ता झालेल्या व्यक्‍तींचा उलगडा या घाटातून होतो. सहा महिने, वर्ष, वर्षानुवर्ष या घटनांचा उलगडा होत नाही. दरम्यान, 4 महिन्यांपूर्वी अफान हातावर लिहलेल्या महिलेचा मृतदेह खंबाटकी घाटात सापडला असला तरी तो मुख्य रस्त्यालगतच सापडला आहे. यामुळे पोलिसांसमोर याचे आव्हान कायम आहे.

हेही वाचा : 

Back to top button