पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे तुम्हाला शतकी आयुष्य लाभो; अमित शहांना मराठी खासदाराने दिल्या शुभेच्छा | पुढारी

पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे तुम्हाला शतकी आयुष्य लाभो; अमित शहांना मराठी खासदाराने दिल्या शुभेच्छा

मुंबई, पुढारी ऑनलाईन

पेट्रोल आणि डिझेलच्या दरासारखे तुम्ही आयुष्याची शतकपूर्ती करावी ही सदिच्छा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून कोल्हे यांच्या शुभेच्छांची चर्चा होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हे यांनी तयार केलेल्या व्हिडिओत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरांची आकडेवारी ग्राफिक स्वरुपात दाखविण्यात आली आहे. या आकडेवारीत गेल्या वर्षभरात किती दर वाढला हे दर्शविण्यात आले आहे.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीबरोबरच खाद्यतेलांच्या वाढत्या किंमतीवर भाष्य करण्यात आले आहे. सध्या देशभरात पेट्रोल ११२ तर डिझेल १०३ रुपयांच्या वर गेले आहे. एलपीजी गॅसचा दर ४०० रुपयांवरून ९०० रुपयांवर गेला आहे. खाद्यतेलाचे दर सतत चढेच आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दर वाढल्याने महागाई प्रचंड वाढत आहे. भाजीपाल्याचे दरही वाढतच आहेत.

काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी इंधनाचे दर वाढत आहेत त्यावर कुणी बोलत नाहीत, असा उद्वेग व्यक्त केला होता. आज अमित शहा यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी शहा यांना शुभेच्छा देताना या सर्व बाबींचा उल्लेख करत चढत्या दरांचा आलेख तयार करून व्हिडिओ द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. हा शुभेच्छा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून तो देशभर गाजत आहे. कोल्हे यांनी हिंदीतून दिलेल्या या शुभेच्छांची चर्चा होत आहे.

खाद्यतेलाच्या दराप्रमाणे कर्तृत्वचा आलेख वाढवा

हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्‌छा. पेट्रोल ,डिझेल च्या दराप्रमाणे तुमच्या आयुष्याने शतकपूर्ती करावी. खाद्यतेलाच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या कर्तृत्वाचा आलेखही वाढत रहावा, हीच सदिच्छा.

हेही वाचा : 

Back to top button