परमबीर सिंग खंडणीप्रकरणी दुसरी अटक - पुढारी

परमबीर सिंग खंडणीप्रकरणी दुसरी अटक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यात अल्पेश भगवानभाई पटेल नावाच्या एका हवाला ऑपरेटरला बुधवारी कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

त्याला स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सुमीत सिंग ऊर्फ चिंटूला पोलिसांनी अटक केली होती.

अल्पेश हा या गुन्ह्यात अटक झालेला दुसरा आरोप आहे, तर परमबीर सिंग यांच्यासह पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेले सचिन वाझे, विनय सिंग ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे.

गोरेगाव येथे राहणारे विमल अग्रवाल हे हॉटेल, बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच ते शासकीय कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. अकरा वर्षांपूर्वी त्यांना खंडणीसाठी धमकी आली होती. यावेळी त्यांची सचिन वाझेशी ओळख झाली होती.

सचिन वाझेकडूनच त्यांना परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सचिनने सांगिल्याप्रमाणे परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. वाझे यांना परमबीर सिंग यांनी दिवसाला दोन कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. याकामी सचिनने त्यांची मदत घेतली होती.

शहरातील हॉटेल आणि बुकींची माहिती देऊन पैसे वसुलीचे सत्र सुरू केले होते. या वसुलीसाठी सचिन वाझेने काही ठिकाणी कारवाई केली होती. त्यात बुकीसह बारवर कारवाई करून काही आरोपींना पाहिजे आरोपी दाखवले होते. त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.

परमबीर सिंगयांच्या सांगण्यावरून सचिन वाझेसह विमल अग्रवाल यांच्याकडून आरोपींच्या वतीने बारा लाख रुपये खंडणी स्वरुपात घेतली, तसेच तीन लाख रुपयांचे दोन महागडे फोन घेतले होते. सुरुवातीला त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

मात्र नंतर कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे, सुमीत सिंग ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंग ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्यांचा तपास नंतर कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हा दाखल होताच सुमीत सिंग ऊर्फ चिंटू याला पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणात अल्पेश पटेल याचा महत्त्वाचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे अल्पेशचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरू असतानाच त्याला बुधवारी गुजरात येथील मेहसाना शहरातून पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. खंडणीच्या या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पेश हा हवाला ऑपरेटर असून तो हवालामार्फत पैशांचा व्यवहार करतो. त्याने आतापर्यंत परमबीर सिंग, सचिन वाझेसह इतरांचा काळा पैसा हवालामार्फत ट्रान्स्फर केल्याचा आरोप आहे.

 

Back to top button