सांगली जिल्ह्यात निर्बंध १९ जुलैपर्यंत | पुढारी

सांगली जिल्ह्यात निर्बंध १९ जुलैपर्यंत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा हजारी पार गेली आहे. जिल्हा अद्याप चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध दि. 19 जुलैपर्यंत वाढविण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

ते म्हणाले, आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट काढण्यात येत आहे. दि. 9 जुलै रोजी संपलेल्या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 च्या दरम्यान आला आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

जून महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते; परंतु रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. दि. 12 जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यास निर्बंध शिथिल करण्यात येणार होते; परंतु दि. 9 जुलैपर्यंत आलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा 10 ते 20 च्या दरम्यान आला आहे.

दरम्यान, निर्बंधावरून व्यापारी आता आक्रमक झाले आहेत. दुकाने सुरू करायची की नाही याबाबत व्यापार्‍यांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांच्या एका गटाने दुकाने सुरू करण्याचा केलेला प्रयत्न दुसर्‍या गटाने मात्र हाणून पाडला होता. त्यामुळे व्यापारी काय भूमिका घेतात याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.

महापालिकेचे निर्बंध धाब्यावर

मिरजेतील लोणी बाजार परिसरात भाजी विक्रेत्यांची गर्दी होऊ लागल्याने महापालिकेने बाजार सील केला आहे; परंतु मिरजेतील भाजी विक्रेत्यांकडून महापालिकेचे निर्बंध धाब्यावर बसण्यात आल्याचे दिसून येते.सील केलेल्या भागातच व्यापार्‍यांकडून भाजी विक्री केली जात असल्याचे दिसून येते.

हे सुरू राहणार

वृत्तपत्र छपाई व विक्री, सर्व किराणा दुकान रुग्णालये, औषध दुकाने बेकरी, मिठाई भाजीपाला, फळ विक्री, खाद्य पदार्थ विक्रीची
दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केट, दूध संकल, दूध वाहतूक, चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण, सर्व वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ न होणारे घटक सर्व बंदच राहणार आहेत.

व्यापार्‍यांची आज बैठक…

जिल्हा चौथ्या टप्प्यात असल्याने शासनाकडून निर्बंधांना देखील वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. याला व्यापारी वैतागले आहेत. प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणे सुरू ठेवून व्यापारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करायचे की, निर्बंध झुगारून बाजारपेठा सुरू करायच्या याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि. 12) व्यापार्‍यांची बैठक होणार आहे.

Back to top button