मडगाव : नुवेत पुन्हा राजकीय राडा | पुढारी

मडगाव : नुवेत पुन्हा राजकीय राडा

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी केक भरवण्यासाठी गेलेल्या ‘आप’च्या महिला कार्यकर्त्यांशी झटापट केल्याप्रकरणी नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा (बाबाशान) यांनी माफी मागावी, अशी मागणी करत डिसा यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेलेल्या आपच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये आणि आमदार डिसा यांच्या समर्थकांमध्ये दुसर्‍या दिवशीही शाब्दिक बाचाबाची झाली.

दोन्ही राजकीय गट एकमेकांवर चाल करून आले होते, पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना एकमेकांशी भिडण्यापासून रोखले. ‘आप’च्या महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, राहुल म्हांबरे, सिसील रॉड्रीगीस, वाल्मिकी नाईक यांच्यावर दगड, कुजलेली अंडी आणि टोमॅटो फेकून मारण्याच्या शनिवारच्या घटनेचे पडसाद रविवारी उमटले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आणि भाजपात गेलेल्या दहाही आमदारांच्या ‘त्या’ पक्षांतराच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी आपच्या प्रतिमा कुतिन्हो व इतरांनी नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या घरी जाऊन त्यांना केक भरविण्याचे उपहासात्मक आंदोलन झेडले होते.

यावेळी चिडलेल्या डिसा यांच्या समर्थकांनी आपच्या कार्यकर्त्यांवर अंडी फेकून मारली होती. डिसा यांच्या पत्नीने आपच्या कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन केले आणि एका महिला कार्यकर्तीला थप्पड मारली, त्यामुळे आपचे कार्यकर्ते संतापलेे होते.

आमदार डिसा यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आपचे सुमारे दीडशे कार्यकर्ते रविवारी सकाळी अकाराच्या सुमारास नुवेत डिसा यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले होते. डिसा यांचा प्रतिकात्मक पुतळाही त्यांनी तयार करून आणला होता. आपचे कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मिळताच डिसा यांचे समर्थक शेकडोंच्या संख्येने कार्यालयाजवळ जमले.

या घटनेची माहिती फातोर्डा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक कपिल नायक फौजफाटा घेऊन घटनास्थळी हजर झाले. दोन्ही बाजूंनी शेकडोंचा जमाव जमला होता. आपच्या कार्यकर्त्यांनी डिसा यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. कार्यकर्त्यांची संख्या पाहून पोलिस निरीक्षक नायक यांनी वेर्णा, मायणा-कुडतरी आणि मडगावहून पोलिस फौजफाटा मागविला.

पोलिसांची तत्परता

आपचे कार्यकर्ते आमदार डिसा यांच्या कार्यालयाकडे गेल्यास दोन्ही गटात धुमश्चक्री होण्याची शक्यता गृहीत धरत तिकडे जाणारा रस्ता बॅरीगेट्स लावून बंद करण्यात आला. पण आपचे कार्यकर्ते हा अडथळा ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात होते पण त्यांना पोलिसांनी अडवून धरले. आम्हाला शांतपणे आंदोलने करू द्या. डिसा यांनी माफी मागावी, त्यानंतर आम्ही निघून जाऊ, अशी मागणी प्रतिमा कुतिन्हो व इतर आपचे कार्यकर्ते करत होते.

राड्याला सुरुवात

बराच वेळ डिसा यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून धरले आणि शांत राहण्याची विनंती केली. तर दुसरीकडे आपच्या कार्यकर्त्यांनी आमदार डिसा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे डिसा यांच्या समर्थकांचा संयम तुटला. त्यांनी पोलिसांची साखळी तोडली आणि आपच्या जमावाच्या दिशेने धाव घेतली.

टोमॅटो व अंडी फेकली

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी झुंजणार तोच पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी धाव घेऊन त्यांना बॅरिगेट्स ओलांडू दिले नाही. तासभर दोन्ही गटांत जोरदार शाब्दीत चकमक सुरू होती. प्रतिमा कुतिन्हो आणि इतरांवर यावेळी कुजलेले टोमॅटो आणि अंडी फेकण्यात आली. स्वतः आमदार डिसा या जमावात सहभागी झाले होते. आपल्या नुवेतील लोकांचा आपण भाजपात गेल्याविषयी आक्षेप नाही, तर प्रतिमा यांना का त्रास होत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नुवेत तणावपूर्ण शांतता

आपकडून डिसा यांचा पुतळा दहन करण्यासाठी आणला होता.तो काढून घ्यावा अशी मागणी डिसा यांच्या समर्थकांनी केली. पोलिसांनी कडक भूमिका घेत तो पुतळा काढून घेतला. आपकडून आमदार डिसा आणि फ्रिडा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात होती. अखेर डिसा यांनी पोलिसांना पाच मिनिटांचा अवधी देत आपच्या कार्यकर्त्यांनी तेथून हाकलण्यास सांगितले. पाच मिनिटांत ते नुवेतून न गेल्यास आम्ही त्यांना हाकलून लाव,ू असा इशारा त्यांनी दिला. पोलिसांनी समजूत काढीत आपच्या कार्यकर्त्यांना संरक्षणात बाहेर काढले. या प्रकारामुळे नुवेत तणाव निर्माण झाला होता. खबरदारीचे उपाय म्हणून नुवेत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंचसुद्धा बनण्याची लायकी नाही : डिसा

प्रतिमा कुतिन्होचे प्रताप गोव्यातच नव्हे, तर दिल्लीतसुद्धा प्रसिद्ध आहेत. आपकडून पैसे मिळतात म्हणून प्रसिद्धीसाठी प्रतिमा अशा प्रकारचे स्टंट करत असल्याचा आरोप आमदार विल्फ्रेड डिसा यांनी केला. आपण आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून भाजपात गेलो. मुख्यमंत्री सावंत यांनी नुवेत विकासकामांसाठी भरपूर सहकार्य केले आहे. मतदारसंघातील लोक त्यामुळे समाधानी आहेत. कुतिन्हो यांनी काँग्रेसमध्ये राहून आपल्याला जाब विचारण्याची आवश्यकता होती. आपमध्ये जाऊन आपल्याला जाब विचारण्याचा अधिकार त्यांना नाही, असे ते म्हणाले. प्रतिमा आमदार सोडाच, पण एक पंचसुद्धा बनण्याच्या लायकीच्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

Back to top button