अतुल लोंढे यांची प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती - पुढारी

अतुल लोंढे यांची प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अतुल लोंढे यांची प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती केल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदाच्या आपल्या योगदानाकडे दुर्लक्ष केले गेले आणि मुख्य प्रदेश प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केली. मुख्य प्रवक्ते पदी आपली नियुक्ती व्हायला हवी होती, अशी नाराजी सचिन सावंत यांनी व्यक्त केली. बरेच वर्षे आपण हे काम करत असल्यामुळे आता आपल्याला पक्षसंघटनेत इतर काही जबाबदारी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी नवनियुक्त प्रदेश पदाधिकार्‍यांना जबाबदारीचे वाटप केले. अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी सोपवली. सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

सचिन सावंत हे सुरवातीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गटाचे ओळखले जात. चव्हाण हे आदर्श प्रकरणात अडकल्यानंतर सावंत यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा गटात शिरले. त्यानंतर पुन्हा अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष होताच सावंत प्रवक्तेपदी कायम राहिले. बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात सावंत प्रवक्ते राहिले. मात्र नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांच्याशी सावंत यांचे बिनसले.

इतर जबाबदार्‍या…

प्रदेशाध्यक्ष व मान्यवरांच्या दौर्‍याच्या नियोजन – देवानंद पवार, सोशल मीडिया विभाग – विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दीप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी – रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी – राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे, प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख – माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी शाम उमाळकर, संजय बालगुडे व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके, राजकीय कार्यक्रम नियोजन समिती प्रमुख- माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सूर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे, बुथ विस्तार समितीच्या प्रमुख- भा. ई. नगराळे, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे.

Back to top button