यवतमाळ : जन्मदात्या आईने आणि मावशीने रचला कट; मुलाची दिली सुपारी | पुढारी

यवतमाळ : जन्मदात्या आईने आणि मावशीने रचला कट; मुलाची दिली सुपारी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : मुलाच्या सततच्या जाचाला कंटाळून जन्मदात्या आईने आणि त्याच्या मावशीने नातेवाईकांची मदत घेत कट रचला अन् मुलाला संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. २० एप्रिल रोजी ही घटना घडली होती, रविवारी ती उघडकीस आली. योगेश विजय देशमुख (वय २५) रा. नेरपिंगळी, ता. मोर्शी, जि. अमरावती असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी संशयीत आरोपी आईसह सहाजणांना अटक केली.

या प्रकरणात पोलिसांनी त्याची आई वंदना विजय देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी, मावसभाऊ लखन चौधरी, तीघेही रा. देवीनगर, यवतमाळ यांना अटक केली आहे. तर सुपारी घेवून योगेशची हत्या करणारे विक्की भगत व राहुल पठाडे रा. देवीनगर, लोहारा यांनाही ताब्यात घेतले आहे. मुलाचा प्रचंड त्रास आहे, त्याच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. मुलाला गावावरून यवतमाळात पाठविले. तो मामाकडे काही दिवस राहिला. या दरम्यान आई वंदना हिने बहिण उषा चौधरी हिच्या घरी जावून योगेशच्या खुनाचा कट रचला. पाच लाख रुपयात खुनाची सुपारी देण्याचे ठरले. त्यापैकी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स देण्यात आला. विकी भगत व राहुल पठाडे या दोघांनी योगेशला २० एप्रिल रोजी चौसाळा जंगलात नेवून त्याची हत्या केली. दोघांनी योगेशचा गळा आवळला. नंतर दगडाने त्याच्यावर प्रहार केले. या प्रकरणी योगेशचे मामा प्रफुल्ल वानखेडे रा. बांगरनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हत्येनंतर सुपारी घेणारे विकी आणि राहूल पाच लाख रुपयांची मागणी करू लागले. पैसे देण्यासाठी योगेशची आई व मावशी यांच्यावर दबाव आणू लागले. प्रतिसाद मिळत नसल्याने २९ एप्रिल रोजी विकी भगत याने डायल ११२ वर कॉल करुन चौसाळा जंगलात मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले, योगेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या खिशात डॉक्टरची चिठ्ठी सापडली. त्यावर योगेशच्या आईचे नाव व संपर्क क्रमांक नमूद होता. या आधारावरून लोहारा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. ठाणेदार दीपमाला भेंडे, पोलिस उपनिरीक्षक सारिक फुसे, जमादार श्याम पांढरकर, संतोष आत्राम, जयंत ब्राम्हणकर, दिलीप सावळे, नितीन गजभार यांनी आरोपींना अटक केली.

हेही वाचा : 

 

Back to top button