पैसे आमचे, मग प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? केंद्राला हायकोर्टाची नोटीस | पुढारी

पैसे आमचे, मग प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? केंद्राला हायकोर्टाची नोटीस

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

आम्ही स्वत:च्या पैशाने लस घेतली, मग प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कशाला हवा, तो फोटो त्वरित हटवा, अशी मागणी एका व्यक्तीने केरळ हायकोर्टात केली आहे. याप्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावली असून उत्तर मागवले आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला. या फोटोवर अनेकांनी आक्षेप घेतले. मात्र, तो फोटो हटविण्यात आला नाही. याविरोधात आता केरळमधील पीटर म्यालीपराम्बिल ही व्यक्ती थेट हायकोर्टात गेली आहे. आम्ही स्वत:च्या पैशांनी लस घ्यायची तर मग पंतप्रधान मोदी यांचा फोटो कशाला? असा सवाल केला आहे.

‘सरकारला पुरेशा कोरोना लस उपलब्ध करुन देता आली नाही. त्यामुळे मी स्वतः पैसे खर्च करुन कोरोना लस घेतली. मात्र, सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावला आहे. फोटो छापून श्रेय घेण्याचा मोदींना कोणताही अधिकार नाही’ असे पीटर यांनी याचिकेत म्हटले आहे. लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो त्यांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणार आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

तसेच, ‘सरकारी लसीकरण केंद्रावर स्लॉटच उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात जाऊन ७५० रुपये देऊन लस घ्यावी लागली. त्यामुळे मोदींना लसीकरण प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावून याचं श्रेय घेण्याचा कोणताही अधिकार नाही’ असे म्हटले आहे. अमेरिका, इंडोनेशिया, इस्राईल, कुवेत, फ्रास आणि जर्मनी यांसारख्या जगभारातील देशात कुठल्याही प्रमाणत्रावर असे लोकप्रतिनिधींचे फोटो लावले गेले नाहीत. हे केवळ एखाद्या व्यक्तीने लसीकरण घेतले किंवा नाही हे समजण्यासाठी दिलेले प्रमाणपत्र आहे. त्यावर मोदींचा फोटो कशाला?’ असा सवालही केला आहे.

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला यावर आपलं म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस दिली आहे.

फोटो म्हणजे निवडणूक कॅम्पेनिंग

लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो म्हणजे निवडणूक कॅम्पेनिंग आहे, अशी टीका अनेकदा विरोधी पक्षांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात लशींचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका होत होती.

हेही वाचा : 

Back to top button