इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या चौकशीचे आदेश | पुढारी

इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या चौकशीचे आदेश

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा

पदाचा गैरवापर करुन नगरपालिकेची मालमत्ता स्वत: च्या पक्ष कार्यालयासाठी वापरल्या प्रकरणाची चौकशी करुन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील व आरोग्य सभापती विश्वास डांगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

विश्वास डांगे म्हणाले, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पदाचा गैरवापर करुन पालिकेच्या नाट्यगृहातील गाळे नातेवाईकांच्या नावावर भाड्याने घेवून भाजप पक्ष कार्यालय सुरु केले होते. हा भाडेकरारही पुर्णपने बेकायदेशीर होता. वास्तवीक कायद्यानुसार पदाधिकाऱ्यांना पदाचा गैरवापर करुन पालिकेची मालमत्ता वापरता येत नाही.

ते म्हणाले, या सर्व बेकायदेशीर प्रकरणावर आम्ही सभागृहात आवाज उठविला होता. म‍ात्र आम्हाला यावर बोलू दिले गेले नाही. त्यामुळे सन २०१९ साली उपनगराध्यक्ष दादासो पाटील व आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी अँड. उमेश मानकापूरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती.

न्यापमुर्ती एस.जे.कातवाला व न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपिठासमोर यावर सुनावणी झाली. आमचे म्हणने एकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी या याचीकेवर निकाल देताना जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्याच्या आत या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शहाजी पाटील म्हणाले, हे प्रकरण अंगलट येवू लागल्याने नगराध्यक्षांनी हे काळे सोडले आहेत. पालिकेच्या १८० वर्षाच्या इतिहासात प्रथमच न्यायालयाचे फटक्यावर फटकारे पालिकेला बसत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांनी कायदेशीर मार्गानेच कारभार करुन नागरीक‍ांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. अन्यथा बेकायदेशीर कारभाराविरोधात आम्ही अशाच कायदेशीर लढाया लढत राहू.

हेही वाचलत का?

Back to top button