दरवर्षी प्रमाणे येथील प्रसिध्द व ऐतिहासिक काळाराम मंदिरात श्री रामजन्मोत्सव अभूतपूर्व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यासह काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, मंदिर विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी, शुभम मंत्री यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने काळाराम मंदिरात पहाटे साडे पाच वाजता महंत सुधीरदास पुजारी यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. यानंतर सकाळी ७ वाजता यंदाचे मानकरी बुवा समीर पुजारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तर दुपारी बारा वाजता मंदिर गाभाऱ्यास बंद पडद्याआड सुरू असलेला पूजाविधी पूर्ण झाल्यावर, पडदा उघडण्यात आला. पडदा उघडता क्षणी उपस्थित भाविकांनी एकच रामनामाचा जयघोष करीत व पारंपारिक वाद्याच्या गजरात रामजन्म साजरा करण्यात आला. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना रामजन्म बघण्यासाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर सायंकाळी ७ वाजता काळारामास ५६ प्रकारचे नैवेद्य अर्पण करून अन्नकोट मानकरी बुवा समीर पुजारी यांच्या हस्ते झाला. दरम्यान, भाविकांनी दिवसभर काळाराम मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराचा मुख्य पूर्व दरवाजाने भाविकांना प्रवेश दिला जात होता. तर उत्तर व दक्षिण दरवाजाने या भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. यावेळी मंदिर संस्थान तर्फे भाविकांना पाचशे किलो पंजरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.