नगर : गुंड विजय पठारेसह सहा जणांवर मोक्का! | पुढारी

नगर : गुंड विजय पठारेसह सहा जणांवर मोक्का!

नगर ; पुढारी वृत्तसेवा : जबरी चोर्‍या, हाणामार्‍या, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळे असे अनेक गुन्हे दाखल असलेला नगर शहरातील कुख्यात गुंड विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर) याच्यासह त्याचे सहा साथीदारांच्या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. नाशिक कार्यालयाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

बालिकाश्रम रोड परिसरासह शहराच्या विविध भागात गुंडगिरी करून दहशत निर्माण करणारा आरोपी विजय पठारे याला काही महिन्यांपूर्वीच तोफखाना पोलिसांनी पुणे येथून शिताफीने अटक केली होती. पोलिस अधीक्षक पाटील यांनी सराईत गुन्हेगार व गुंडांवर कठोर कारवाई व्हावी, या उद्देशाने मागील काही महिन्यांपासून उपाययोजना सुरू केल्या आहेत.

त्याचाच भाग म्हणून तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासात विजय राजू पठारे व त्याच्या टोळीने संघटितपणे अनेक गुन्हे केल्याचे समोर आले होते. पोलिस अधीक्षक पाटील यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलिसांनी जून महिन्यात विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली असून, पठारेसह त्याचे पाच साथीदार अशा सहा जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

क्रिकेट : भारत-श्रीलंका मालिका आता १८ जुलैपासून

युरो कप : इंग्लंड – इटली भिडणार

टोळीप्रमुख विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, बंडू ऊर्फ सूरज साहेबराव साठे, अनिकेत विजू कुचेकर, प्रशांत ऊर्फ मयूर राजू चावरे, अक्षय गोविंद शिरसाठ (सर्व रा. सिद्धार्थनगर, नगर) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांसह जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अनाधिकाराने घरात प्रवेश करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, विनयभंग, दुखापत करणे, हद्दपारी आदेशाचा भंग करणे, गंभीर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे आदी विविध 12 ते 13 गुन्हे पठारे व त्याच्या टोळीविरोधात दाखल आहेत.

त्यामुळे पठारे व त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1)(11), 3(2) व 3(4) म्हणजेच मोक्का अन्वये कारवाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे करणार्‍या टोळीविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. गंभीर गुन्हे करणार्‍या टोळी विरोधात येत्या काळातही मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून जिल्ह्यातील इतरही काही गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

तोफखाना हद्दीतच सर्वाधिक गुन्हे

टोळी प्रमुख पठारेसह त्याच्या साथीदारांकडून होत असलेल्या दहशतीमुळे, बालिकाश्रम रस्त्यावरील व्यावसायिक व नागरिक त्रस्त होते. विशेष म्हणजे, या टोळीवर केवळ तोफखाना हद्दीतच सर्वाधिक 12 गुन्हे दाखल आहेत. तर, एक गुन्हा कोतवाली हद्दीत दाखल आहे. मागील दहा वर्षांपासून या टोळीवर गुन्हे दाखल असून, सध्या हे सर्व आरोपी अटकेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दहा वर्षांपासून शहरात माजवतोय दहशत

टोळी प्रमुख विजय पठारे याच्यावर कोतवाली पोलिसात सन 2011 मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात 2012 पासून 2021 पर्यंत अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले होते. त्याला तडीपारही करण्यात आले होते. मागील दहा वर्षांपासून पठारे हा साथीदारांसह नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन गुन्हेगारी कृत्य करत होता. पोलिस अधीक्षक पाटील यांनी याची गंभीर दखल घेत अवघ्या महिनाभरातच त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात यश मिळविले आहे.

Back to top button