शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड; संजय राऊतांना हटवलं | पुढारी

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड; संजय राऊतांना हटवलं

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना कुणाची? हा वाद न्यायप्रविष्ट असतांना पक्षातील दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आता शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहून याबाबत माहिती दिली.

“शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करीत माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री शिंदे तसेच संसदेतील सर्व शिवसेनेतील सहकाऱ्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो”, असे ट्विट नियुक्तीनंतर किर्तीकर यांनी केले आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवून गजानन किर्तीकरांची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. यानुसार या महत्वाच्या बदलाची माहिती मुख्यमंत्री शिंदेंच्या गटाकडून लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्वाच्या पदावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वी संसदेतील पक्ष कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्याजागी स्व.आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. शिवसेनेतील बंडानंतर काही काळ ठाकरे गटासोबत असलेले किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना शिंदे गटाने मोठी जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button