तुळजापूरमध्ये आजपासून ‘आई उदो उदो’चा गजर! - पुढारी

तुळजापूरमध्ये आजपासून ‘आई उदो उदो’चा गजर!

तुळजापूर; संजय कुलकर्णी : दीड वर्षांनी भक्तांसाठी घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवारी मंदिरे खुली होत आहेत. याअंतर्गत महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेचे दारही खुले होत असून, शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. गेल्या बुधवारी (दि. 29 सप्टेंबर) भाद्रपद वद्य अष्टमी दिवशी सायंकाळी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा अश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे संपणार असून, 8 दिवस पूर्ण निद्रा घेऊन नवव्या दिवशी मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापित होत आहे.

सिंहासनावर मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मूर्तीला एक आठवड्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचा मानाचा पंचामृत अभिषेक होऊन सालंकृत पूजा पार पडून नैवेद्य, धुपारती, अंगारा काढल्यानंतर 4 तास मुख व धर्म दर्शनासाठी मूर्ती सज्ज होते. त्यानंतर पुन्हा देवीच्या नित्य पूजेची घाट होऊन मूर्तीला दुसर्‍यांदा पंचामृत अभिषेक घालून शोड्षोपचार पूजा पार पडून नैवेद्य, धुपारती, अंगारा काढून सिंह गाभार्‍यात घटस्थापनेचा विधी पार पडणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मातेचा शारदीय नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असून सर्व धार्मिक सोहळे, पूजा विधी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.

घटस्थापनेला राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर गुरुवारी (7 ऑक्टोंबर) मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले होत असले तरी सामान्य भाविकांना सायंकाळी सहा वाजता मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे.

घटस्थापनेच्या विधिनंतर स्थानिक 148 ब्रम्हवृंदाना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते नवरात्रौत्सव काळात अनुष्ठानासाठी वर्णी दिली जाणार आहे.
तुळजाभवानी मंदिरातील परिवार देवता म्हणून गणल्या जाणार्‍या अदिमाया आदिशक्ती मातंगी देवी, येमाई देवी, जेजुरी खंडोबा, लक्ष्मी – नरसिंह मंदिरातही घटस्थापनेचा विधी पार पडतो.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंगळवारी सायंकाळी तुळजापूर शहरात येणारे सर्व मार्ग पोलिस यंत्रणेने शहरापासून 5 की.मी. अंतरावर बॅरिगेटिंगद्वारे बंद केले आहेत. भाविकांची तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. शिवाय वाहनांचीही नाकाबंदी केली जात आहे. परिणामी बुधवारी सकाळी सर्वपित्री अमावस्येदिवशी शहरात भाविकांची गर्दी सामान्य दिसत होती.

दरम्यान, ‘भवानीज्योत’ आपापल्या गावाकडे घेवून जाणार्‍या तरुणांची वर्दळही तुरळक दिसत होती.शहरातील सर्व रस्त्यांवर लाकडी दुभाजक टाकले असून येण्या- जाण्याचे मार्ग स्वतंत्र करण्यात आले असून मंदिराच्या मुख्य महाद्वारात पोलिसांनी 20 फुटापर्यंत बॅरिगेटिंग करून नाकाबंदी केली आहे.

दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना मुहूर्त

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (दि. 7) मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. पहाटे पाचपासून ते दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या वेळेत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.10 ऑक्टोबरला रविवारी ललिता पंचमी आहे.

12 ऑक्टोबरला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. 13 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास आहे, तर 14 ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्रौत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. दुसर्‍या दिवशी 15 तारखेला दसरा आहे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button