घटस्थापनेपासून विठ्ठल रुखमाई दर्शन; ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र ‘हा’ निर्णय | पुढारी

घटस्थापनेपासून विठ्ठल रुखमाई दर्शन; ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र ‘हा’ निर्णय

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा

घटनस्थापनेपासून विठ्ठल रुखमाई दर्शन खुले करण्यात येणार असून दररोज १० हजार भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे. यात पाच हजार बुकिंग केलेल्या आणि पाच हजार बुकिंग न करता आलेल्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

या भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुख दर्शन घेता येणार आहे. आरोग्य तपासणी करूनच दर्शनाकरिता भाविकांना मंदिरात सोडले जाणार आहे. मंदिर समितीकडून तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मात्र, ६५ वर्षांवरील नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर, प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनाकरिता खुली करण्यात येणार आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही दर्शनाकरिता भाविकांना सोडण्यात येणार आहे. मात्र पदस्पर्श ऐवजी मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. या संदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत दररोज १० हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विजया दशमीपासून सकाळी ६ ते ७ या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे.

तासाला ७०० ते १००० भाविकांना विठ्ठल रुखमाई दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामधे ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. दर्शनास येणार्‍या भाविकांची कोरोना चाचणी सक्तीची असणार नाही.

मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तर मंदिरांमध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान राज्यातील मंदिरे बंद होती. त्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेले लोक, त्यातच नागरिकांना आपल्या देवाचे दर्शन घेता येत नव्हते. आता राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन, च्या अंतर्गत कोरोना नियमांचं पालन करुन भाविकांना दर्शन देणार देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजीराजे शिंदे, साधनाताई भोसले,शकुंतला नडगिरे, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे,ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर आदी उपस्थित होते.

यांना दर्शन मिळणार नाही

श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाकरीता १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना सरकारच्या आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे. मात्र, ऑनलाईन बुकिंग करुन येणार्‍या भाविकांची संख्या ५ हजारांपेक्षा कमी राहिली तर त्यावेळी स्पॉट बुकिंग करुन दर्शन व्यवस्था केली जाणार आहे.

अशी असेल दर्शन नियमावली
  • घटस्थापनेदिवशी मुख दर्शन सुरू
  • सकाळी 6 ते 7 या वेळेत स्थानिक भाविकांना दर्शन
  • सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत ऑनलाईन बुकिंग केलेल्या
  • 5 हजार भाविकांना तर बुकिंग न केलेल्या 5 हजार भाविकांना दर्शन
  • ऑनलाईन बुकींगची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध
  • भाविकांसाठी आरोग्य सुविधा देण्यात येणार
  • मंदिरात हार, फुले घेवून जाण्यास मनाई
  • अन्नछत्र व लाडू प्रसाद विक्री बंदच राहील
  • दर्शनासाठी जाताना कासार घाट येथे तपासणी करण्यात येईल
  • भाविकांना श्रींची पूजा उपलब्ध करुन देता येणार नाही
  • एका वेळी ५ च्या जथ्याने भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यात येईल
  • दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी बुकिंग पुरावा, ओळखपत्र आणणे आवश्यक आहे
हेही वाचा :

Back to top button