पुढारी ऑनलाइन डेस्क : CISF Raising Day parade : सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांनी भारतातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. CISF हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा एक महत्वाचा स्तंभ आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी CISF जवानांचा गौरव केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी हैदराबादमधील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमी (NISA) येथे 54 व्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या स्थापना दिनाच्या परेडला हजेरी लावली. CISF ची स्थापना 10 मार्च 1969 रोजी भारतीय संसदेच्या कायद्यांतर्गत करण्यात आली. तेव्हापासून, CISF स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च रोजी साजरा केला जातो. यावर्षी CISF चा वार्षिक स्थापना दिवस आज हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील CISF च्या जवानांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या कर्मचार्यांचे त्यांच्या स्थापना दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रमुख ठिकाणी चोवीस तास सुरक्षा पुरवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
एका ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले, "त्यांच्या स्थापना दिनानिमित्त, सर्व CISF जवानांना शुभेच्छा. आमच्या सुरक्षा यंत्रणेत CISF ची भूमिका महत्त्वाची आहे. ते महत्त्वपूर्ण आणि मोक्याच्या पायाभूत सुविधांसह महत्त्वाच्या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा पुरवतात." तसेच "फोर्स कठोर परिश्रम आणि व्यावसायिक दृष्टिकोनासाठी ओळखली जाते," असे ही ते म्हणाले.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, CISF राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीबाहेर 'रेझिंग डे' साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरवर्षी रेझिंग डे परेड ही गाझियाबादमधील दिल्लीच्या बाहेरील सीआयएसएफ मैदानावर आयोजित केले जात असे. गेल्या वर्षी, शाह यांनी गाझियाबादच्या इंदिरापुरम येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 53 व्या स्थापना दिन समारंभाला हजेरी लावली होती. यावेळी ही परेड हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली. दरम्यान, आज अमित शाह म्हणाले, "देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या अटल वचनबद्धतेला मी सलाम करतो."
गेल्या काही वर्षांपासून सर्व निमलष्करी दले दिल्लीबाहेर त्यांचा स्थापना दिवस साजरा करत आहेत. 19 मार्च रोजी, CRPF छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात वार्षिक स्थापना दिवस आयोजित करेल.