रेव्ह पार्टी : दिल्लीस्थित आयोजक एनसीबीच्या रडारवर | पुढारी

रेव्ह पार्टी : दिल्लीस्थित आयोजक एनसीबीच्या रडारवर

मुंबई ; पुढारी डेस्क : मुंबईजवळ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आलिशान क्रूझवरील उधळलेल्या रेव्ह पार्टी चा दिल्लीस्थित एक आयोजक अर्जुन जैन याला ताब्यात घेतले जाऊ शकते. 32 वर्षीय अर्जुन जैन नामाज क्रे एक्सिपिरियन्स प्रा.लि. चा संचालक आहे. याशिवाय आणखी सहा आयोजकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

एफ टीव्ही इंडिया या पार्टीचे मुख्य आयोजक असल्याचे सांगण्यात आले. एफ टीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान एनसीबीच्या रडारवर असून, ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हात असल्याचे समजतेे.

‘कॉडेर्र्लिया द एम्प्रेस’ या क्रूझवर 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान पार्टी आयोजनाचे कंत्राट नामाज क्रे कंपनीला देण्यात आले होते. आयोजकांना या पार्टीत अमली पदार्थ असल्याची कल्पना होती का, याबाबत आता चौकशी केली जाईल. अर्जुन जैनसह समीर सेहगल आणि गोपालजी आनंद या त्याच्या साथीदारांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. 30 ऑक्टोबर 2020 रोजी नामाज के्र कंपनी सुरू झाली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करणार्‍या अर्जुन जैनने 2017 मध्ये पॉपस्टार जस्टीन बिबर याचा नवी मुंबईत कार्यक्रम ठेवला होता. गेल्या ऑगस्टमध्ये मोठ्या संगीत कार्यक्रमाच्या बहाण्याने एका व्यक्तीला 5 कोटींंना ठकवल्याचा आरोप जैनवर होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जैनला नंतर जामीन मिळाला होता. कार्यक्रम आयोजित करणार्‍या अन्य 10 कंपन्यांमध्ये अर्जुन जैन भागीदार अथवा संचालक आहे.

समीर सेहगल आणि गोपालजी आनंद हे दोघे कार्यक्रमाची तिकीट विक्री, पाहुण्यांची यादी बनवणे, महनीय व्यक्तींना निमंत्रण देणे आदी कामे पाहात होते.

‘क्रूझचा पार्टीशी संबंध नाही’

या रेव्ह पार्टीमध्ये आयोजकांची भूमिका तपासण्यात येत असल्याचे एनसीबीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या रेव्ह पार्टीशी आपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे स्पष्टीकरण कॉर्डेलियाच्या वतीने जर्गेन बेलम यांनी दिले. आमचे क्रूझ विविध समारंभांसाठी भाड्याने घेतले जातात. अशी पार्टी क्रूझवर झाली असल्यास आम्ही जाहीर निषेध करतो. रेव्ह पार्टीसाठी आमचे जहाज दिले जात नाही, असे बेलम यांनी स्पष्ट केले.

मला पाहुणा म्हणून बोलावले होते : आर्यन

क्रूझवरील पार्टीमध्ये आपल्याला पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपल्या नावाचा वापर करत इतरांना निमंत्रण दिले होते, असे आर्यन खानने एनसीबीला सांगितले आहे. या पार्टीसाठी आपण कोणतेही पैसे भरले नव्हते, असेही त्याने स्पष्ट केले आहे.

आर्यनचे क्रूझवरील व्हिडीओ एनसीबीच्या अधिकार्‍यांनी मिळवले आहेत. त्यात तो पांढरा टी-शर्ट त्यावर लाल शर्ट, निळी जिन्स आणि टोपीत दिसत आहे. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी आर्यन खानचा मोबाईल जप्त केला असून, त्यात असलेल्या टेक्स्ट मेसेजची तपासणी केली जात आहे, असे एनसीबीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

‘अब्बूने इशारा दिला होता’

चौकशीदरम्यान आर्यन खानने ड्रग्जबाबतच्या आरोपांचा इन्कार केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘सध्या एनसीबीचे लोक सर्वत्र आहेत. कुठेही जाताना सारासार विचार कर आणि काळजी घे, असा इशारा अब्बूने दिला होता’, असेही आर्यन म्हणाल्याचे समजते.

या क्रूझ पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्या दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुली असल्याचे
समजते.

पॅन्टच्या शिलाईत ड्रग्ज

कॉर्डेलिया क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीत सहभागी झालेल्यांनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंतर्वस्त्रांच्या आणि कॉलरच्या शिलाईत अमली पदार्थ आणले होते, अशी माहिती मिळते. त्याआधारे एनसीबी हे ड्रग्ज पुरविणार्‍यांचा शोध घेत आहे.

बटाटा गँगने अडकवले?

बटाटा गँग नावाने कुप्रसिद्ध असलेल्या टोळीचे मुंबईत ड्रग्जचे मोठे जाळे आहे. फारुख बटाटा आणि शादाब बटाटा ही पिता-पुत्रांची जोडी रेव्ह पार्ट्या आयोजित करून ड्रग्ज, अमली पदार्थांचा पुरवठा करतात, अशी माहिती आहे. हाय प्रोफाईल व्यक्तींना अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवून, ब्लॅकमेल करून लाखोंची खंडणी उकळणे अशी बटाटा गँगची ‘मोड्स ऑपरंडी’ असल्याचे सांगण्यात येते.

शाहरूख स्पेनमधून मायदेशी परतणार

शाहरूख खान सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनमध्ये आहे. ड्रग्ज प्रकरणात मुलगा आर्यनला अटक झाल्यामुळे शाहरूख खान स्पेनमधील चित्रीकरण लांबणीवर टाकून तातडीने भारताकडे रवाना होण्याची शक्यता असल्याचे समजते. शाहरूखची पत्नी आणि आर्यनची आई गौरीही इंटेरियर डिझायनिंगच्या एका प्रकल्पासाठी परदेशी जाणार होती. मुलाच्या अटकेमुळे तिने परदेशी जाणे रद्द केल्याचे सांगण्यात येते.

असा आहे आर्यन

शाहरुख खान सतत चर्चेत असला तरी त्याचा मुलगा आर्यन खान फारसा चर्चेत नसतो. तो नेहमी झगमगाटापासून दूर असतो. आर्यनचा जन्म नवी दिल्लीत 13 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. शाहरुख आणि गौरी यांचे हे पहिले अपत्य.याशिवाय या दाम्पत्याला सुहाना आणि अबराम अशी दोन मुले आहेत.

धिरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर आर्यन लंडनच्या सेव्हन ओक्समध्ये पुढच्या शिक्षणासाठी गेला. त्यानंतर साऊदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात त्याने उच्चशिक्षण घेतले. त्याचबरोबर सिनेमा निर्मितीचे प्रशिक्षणही आर्यनने पूर्ण केले आहे. मार्शल आर्टमध्ये त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

सर्वसाधारणपणे सर्वच प्रसिद्ध अभिनेत्यांची मुले चित्रपटात झळकतात. पण आर्यन फारसा झळकलेला नाही. 2001 मध्ये आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात शाहरुखच्या लहानपणाचा रोल त्याने निभावला होता.

2004 मध्ये आलेल्या ‘हम लाजबाब है’ या चित्रपटासाठी डायलॉक रेकॉर्डिंग केले. त्याला बेस्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला आहे. ‘द लायन किंग’मध्ये सिम्बा या पात्रासाठी त्याने आवाज दिला होता.

कशी असते रेव्ह पार्टी?

दारू, ड्रग्ज, हुक्का, गांजा अशा नशेत, मद्यधुंद अवस्थेत डीजे आणि अन्य प्रकारचे संगीत व लेझर लाईट तालावर नाच करणे, धिंगाणा घालणे. अशी पार्टी फार्महाऊ स तसेच कू्रझवर आयोजित केली जाते.

विविध कंपन्या छुप्या पद्घतीने त्याचे आयोजन करतात. या पार्टीसाठी लाखो रुपयांचे तिकीट आकारले जाते. या पार्टीमध्ये सहभागी तरुण-तरुणींकडून नशेमध्ये सेक्स करण्यात येतो. बॉलीवूडचे बरेच कलाकार आणि उद्योगतींची मुले याआधी रेव्ह पार्टीत पकडली गेली आहेत.

Back to top button