कसबा, चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढणार; जागावाटपावर आज निर्णय | पुढारी

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढणार; जागावाटपावर आज निर्णय

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागांवर महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. परंतु आघाडीतील कोणता पक्ष कोणती जागा लढणार यावर एकमत झालेले नाही. याबाबत शनिवारी महाविकास आघाडीकडून घोषणा केली जाणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत जागा वाटपावर तोडगा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावर एकमत झाले नाही.

कसबा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. तर चिंचवडच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा आहे. त्यावर कोणता पक्ष लढला तर त्याचा अधिक फायदा होईल यावर चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाची मतदारसंघात अधिक ताकद आह, या विषयीही चाचपणी करण्यात आली. मात्र ही बैठक निर्णयाविनाच संपली. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि इतर मित्र पक्षांशी चर्चा करून शनिवारी यासंदर्भात घोषणा केली जाईल, असे बैठकीनंतर सांगण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. तीनही पक्षांच्या नेत्यांची चांगली चर्चा झाली. आता आघाडीतील इतर मित्र पक्षांशी आणि वरीष्ठांशी चर्चा करून शनिवारी आम्ही निर्णय घोषित करू.

शिवसेना दावा सोडण्याची शक्यता

शिवसेनेने चिंचवड मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद अधिक असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार हे ठाम आहेत. त्यांच्या आग्रहामुळे शिवसेनेला आपला दावा सोडावा लागणार अशी चर्चा आहे.

पोटनिवडणूक मविआ एकजुटीने लढणार : पटोले

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. तिन्ही पक्ष एकत्र राहिल्याचा निवडणुकीत फायदा झाला आहे. आता या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Back to top button