लॉकडाऊनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्या वाढल्या - पुढारी

लॉकडाऊनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्या वाढल्या

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्यांमध्ये 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार एकूण 1282 नागरिकांनी 2020 मध्ये आत्महत्या केली. म्हणजेच, सरासरी एका दिवसात तीन व्यक्तीने आत्महत्या केली. 2019 मध्ये हा आकडा 1229 होता.

केवळ ज्येष्ठ नागरिक नव्हे, तर 60 वर्षांखालील नागरिकांच्या मानसिकतेवर लॉकडाऊन कालावधीत परिणाम झाला आहे. 18 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये आत्महत्यांची संख्या 13 टक्क्यांनी वाढली. 2020 मध्ये 313 तर 2019 मध्ये 269 आत्महत्या झाल्या. याच वयोगटातील पुरुषांमध्ये आत्महत्यांची संख्या 14 टक्क्यांनी वाढली. 2019 मध्ये 715 आत्महत्या झाल्या तर 2020 मध्ये 816 आत्महत्या झाल्या.

लॉकडाऊनमुळे पुरुषांचे आर्थिक नुकसान, बेरोजगारी तसेच व्यसनाने त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे दिसते. महिला ज्येष्ठ नागरिकांमध्ये तब्बल 60 टक्क्यांनी आत्महत्या वाढल्या. 2019 मध्ये 23 वरून हा आकडा 2020 मध्ये 37 झालेला आहे. त्याच्या उलट पुरुष ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये 21 टक्के वाढ झाली.

2019 मध्ये 69 वरून 2020 मध्ये 84 आत्महत्या झालेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आपल्या दैनंदिन गरजेसाठी व जगण्यासाठी पूर्णपणे दुसर्‍यांवर अवलंबून असतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जवळ कोणीही न आल्यामुळे नैराश्यातून बर्‍याच लोकांनी आत्महत्या केलेली दिसून येते.

लॉकडाऊनमुळे लहान मुलांच्या आत्महत्येत 13 टक्के घट झाल्याचे दिसून येते. लहान मुले या काळात आपल्या आई-वडिलांच्या नजरेखाली राहिले होते, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केला आहे.

कोविडमुळे जवळच्या नातलगाचे निधन झाल्याने ताण वाढत आहे. लॉकडाऊन काळात लहान मुले पालकांसोबत वेळ घालवत होते. शाळा आणि क्लास ऑनलाईन असल्याने खेळायला मोकळीक मिळत होती. तसेच परीक्षेचे दडपण नसल्याने मुले तणावमुक्त राहात आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या आत्महत्येत 13 टक्के घट झाल्याचे दिसून येते, अशी माहिती नायर रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेनल शहा यांनी दिली.

Back to top button