अर्थ (?) संकल्प | पुढारी

अर्थ (?) संकल्प

सौ : अहो, आधी तो टीव्ही बंद करून माझ्यासमोर येऊन बसा. माहीत आहे बजेटवरची भाषणं ऐकून फार डोक्यात प्रकाश पडणार आहे ते. आधी मला सांगा, आपल्या घराचा गृहमंत्री कोण? आपल्या घराचा परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा अर्थमंत्री कोण?

श्री : अगं तूच आहेस. एवढंच काय, संरक्षण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री, क्रीडा मंत्री पण तूच आहेस. बोल, कशाला बोलावले आहेस मला?
सौ : काय सांगत होते बजेटच्या भाषणात? डाळी, साखर, गॅस आणखी स्वस्त/महाग काय होणार आहे?
श्री : बाकी माहीत नाही; पण आतापर्यंत मेकअपवर जबरदस्त टॅक्स लावले आहेत.

सौ : मेकअपचा इतका काय राग आहे निर्मलाबाईला, मला समजत नाही. बरं, ती स्वतः कधी मेकअप करत नाही. मग आमच्यासारख्या हौशी बायकांनी मेकअप केला तर सरकारच्या पोटात का दुखते काय माहीत? मी म्हणते, आम्ही बायका असतोच आधी दिसायला सुंदर. त्यात थोडा मेकअप केला की, आणखी सुंदर दिसतो. ब्यूटी पार्लरवाल्यांचा धंदा जोरात चालू आहे. दिसायला विशेष नसलेली सर्वसाधारण रूपाची वधू अशी झळकवतात की, जशी काही दीपिका पदुकोणच वाटते ती एक दिवसासाठी. सगळी फोटोग्राफीसाठी मरामर.
श्री : अगं पण दुसर्‍या दिवशी मेकअप उतरल्यावर तिचे खरे रूप समोर आल्यावर घरातील लोकांना आणि इतर नातेवाईकांना धक्का बसत असेल नाही?

सौ : उगाच विषय बदलू नका. मला सांगा, जर चार पैसे खर्च करून एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी लग्नासाठी जोरदार मेकअप करून उभी राहात असेल तर शासनाला काय त्रास आहे म्हणते मी? उलट स्वस्त करा आणि करू द्या की मेकअप. म्हणजे फोटो आणि व्हिडीओपुरते चमकदार रूपडे दिसायला काय अडचण आहे? पण नाही. अर्थमंत्री मॅडम स्वतः कोणताच मेकअप करत नाहीत. पावडरसुद्धा कधी लावलेली दिसत नाही. मग त्यांचा मेकअपच्या सामानावर राग असणारच. आता मला सांगा, डाळी, साखर, तेल आणि गॅस हे चार आयटम असे आहेत की, आपल्या घराचे बजेट बिघडवू शकतात. ते कमी करायचे सोडून सरकार भलतीकडेच का बघत राहते ते कळत नाही.

श्री : अगं, समजा, आपले खर्च आटोक्यात राहत नाहीत तर मग आपण उत्पन्न वाढवायला पाहिजे. ते वाढवणार कोण तर मी. म्हणजे संध्याकाळी कंपनीतून घरी परत आल्यावर दोन तास ऑटो चालवतो. लोक ओळखतील, हसतील म्हणून फार तर मफलर गुंडाळून ऑटो चालवीन, काय?

सौ : काही गरज नाही. मी सांगते एरवी तुम्हाला बीपी आणि शुगरचा प्रॉब्लेम झालेला आहे. कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आजपासून तुमच्यासाठी बिना फोडणीचे वरण, बिना तेलाच्या भाज्या करणार मी. सगळे गोड पदार्थ बंद. आपोआप आपले बजेट कंट्रोलमध्ये राहील.
श्री : तुझं मेकअपचं सामानही बंद करूया.

सौ : तुम्ही एवढे सपक खाताय म्हटल्यानंतर पैसे वाचतीलच. त्यात मी दर महिन्याला दोन वेळेला ब्यूटी पार्लरला जाणार म्हणजे जाणार. महिन्यातून तीनवेळा केस काळे करणार म्हणजे करणार. माहितीये का तुम्हाला, आपण दोघं बाहेर पडलो की, लहान मुले तुम्हाला काका म्हणतात आणि मला दीदी म्हणतात. कारण मी तरुण दिसते ना तुमच्यापेक्षा. ही सगळी मेकअपची कमाल आहे. बजेटमध्ये काहीही, कितीही वाढलं किंवा कमी झालं तरी मी मेकअप करणे सोडणार नाही.

Back to top button