ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत | पुढारी

ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओबीसी समाजाच्या वाट्याला कायमच संघर्ष आल्याची खंत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा. जोपर्यंत तुम्ही एकी दाखवत नाही, तोपर्यंत हे सरकार झुकणार नाही. म्हणूनच एकत्रित लढून येणारी जनगणना ही जातिनिहाय झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ओबीसी महासभेतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान देश कधीच नाकारू शकत नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज राष्ट्रपतिपदापासून सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातू हजारो वर्षे पिचलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक योजनांचा लाभ देताना सरकारपुढे अडचणी येतात. आज कोरोनाचे कारण पुढे करत केंद्र सरकार देशात जणगनणा करत नाही. पण, कोरोना जवळपास संपलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर जणगनणा करताना ती जातिनिहाय करावी. ज्या समाजाची जेवढी संख्या असेल, त्या समाजाला तेवढा वाटा दिलाच पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली.

ओबीसींच्या आरक्षणासहित त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम देशात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली होती. पण आम्ही लढलो आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत केले. आता देशातील सर्वच राज्यांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आणली जातेय. उत्तर प्रदेश सरकारला ट्रिपल टेस्ट करण्यास सांगितले आहे. ओबीसींचे हक्क नाकारून देशात एकाधिकारशाही येत असेल तर त्याचा आम्ही विरोधच करू, असे ठाम मतदेखील भुजबळांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

Back to top button