Budget & Halwa : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी का केला जातो 'गाजर हलवा'? जाणून घ्‍या... | पुढारी

Budget & Halwa : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी का केला जातो 'गाजर हलवा'? जाणून घ्‍या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या  १ फेब्रुवारी २०२३ रोजी  २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा संकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारची वित्तीय धोरणे, योजना आणि कार्यक्रमांची रूपरेषा असते. या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. कारण अर्थसंकल्पाचा परिणाम सर्वांवरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हा होतचं असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या अर्थसंकल्पापूर्वी ‘गाजर हलवा समारंभ’ का केला जातो? कोणती कारणे आहेत? चला तर समजून घेऊया अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी का केला जातो ‘गाजर हलवा समारंभ’.(Budget & Halwa)

Budget & Halwa : म्हणून गाजराचा हलवा

आपल्याकडे बहुतांश ठिकाणी एखादं कार्य करत असताना गोड पदार्थ करून सुरुवात केली जाते. अगदी आपल्या देशाचा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीही गाजराचा हलवा केला जातो. या पाठीमागे कोणता लिखित नियम नाही की गाजराचा हलवा का केला जातो आणि कधीपासून केला जातो. हा ‘गाजर हलवा समारंभ’ म्हणून ओळखला जातो. परंपरेनुसार विद्यमान अर्थमंत्री यांच्या हस्ते या समारंभाची सुरुवात केली जाते. त्यांच्या हस्ते अर्थसंकल्पाशी संबंधित असणारे कर्मचारी, वित्त अधिकारी, इतर अधिकारी यांना गाजराच्या हलव्याचे वाटप केले जाते. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांच्या छपाईच्या कामाला सुरुवात होते. अर्थसंकल्प हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये छापले जातात.

कर्मचाऱ्यांचा कोणाशीही संपर्क नाही

आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारची वित्तीय धोरणे, योजना आणि कार्यक्रमांची रूपरेषा असणा-या या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. यावेळचा अर्थसंकल्प कोरोनानंतरचा प्रथमच पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प निर्मिती करत असताना अर्थसंकल्प संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांचा अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते अर्थसंकल्प सादर करेपर्यंत कोणाशीही कोणत्याही प्रकारचा संपर्क येऊ दिला जात नाही. एवढी गुप्तता आणि सुरक्षितता अर्थसंकल्प तयार करताना पाळली जाते. अंदाजे ९० ते १०० च्या आसपास कर्मचारी असतात. हे लोक नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात बांधलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये राहतात. या काळात त्यांना बाहेरच्या जगाशी संपर्क येत नसतो. ना कॉल, ना भेटणं. फक्त एक लॅंडलाईन सुविधा असते. त्याच्यावर फक्त कॉल येण्याची सुविधा असते. आणि हा कॉल अधिकृत कामासाठीच असतो.

सध्याच्या सरकारसाठी शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल, कारण पुढील वर्षी 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा

Back to top button