पंतप्रधान मोदी आज मुंबईत, 'या' विकासकामांचेही हाेणार भूमिपूजन | पुढारी

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, 'या' विकासकामांचेही हाेणार भूमिपूजन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबईत येत आहेत. मोदींचा मुंबई दौरा आणि वांद्रे कुर्ला संकुलातील जाहीर सभा या निमित्ताने भाजप आणि बाळासाहेबांची शिव- सेना मुंबईत जोरदार वातावरण निर्मिती करणार आहे. राज्यात जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असून या दौन्याच्या निमित्ताने भाजपकडून महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

मेट्रो रेल्वे मार्गिकाचे लोकार्पण  

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे १२ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण होणार आहे. यातील दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका २ अ ही सुमारे १८ किमी लांबीची आहे. तर अंधेरी पूर्व दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका ७ सुमारे १६.५ किमी लांबीची आहे. यावेळी मोदी मुंबई १ मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) चा शुभारंभ करतील.

साडेचार हजार पोलिसांचा फौजफाटा   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून दौऱ्याच्या ठिकाणी १०० पो- लीस अधिकारी आणि ०३ हजार ५६२ अंमलदार असा सुमारे साडे चार हजार पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांनी याआधीच वांद्रे-कुर्ला संकूल, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात १९ जानेवारीला २४ तासांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच, सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी केली आहे. गेले तीन दिवस सलग बैठका सुरू आहेत. मोदींचा मुंबई दौरा लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याचे टाळले होते. भाजपच्या नियोजनानुसार मोदींचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात येणार असून शिंदे गटानेही मोदींचा मुंबई दौरा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन मुंबई आणि ठाण्यातील कार्यकत्यांच्या बळावर करण्यात आले आहे.

या दौन्यात मोदींच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थीना मंजूर झालेल्या कजांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे.

मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण, मुंबई महापालिकेच्या २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे ४०० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत.

सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी 

याच कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे सुमारे १७ हजार २०० कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे २ हजार ४६० एमएलडी इतकी असेल.

२० नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण मुंबईतील कार्यक्रमात मोदी २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण करणार आहेत. याशिवाय, ३६० खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील ३०६ खाटांचे सिद्धार्थनगर रुणालय आणि १५२ खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम वा मुंबईमधील तीन रुणालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

४०० किमी लांबीच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या कॉक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ६ हजार ७९ कोटी रुपये खर्च

अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी १ हजार ८०० कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे.

Back to top button