रायगड : महाविद्यालयांना मिळणार जागतिक बँकेचे अर्थसहाय्य | पुढारी

रायगड : महाविद्यालयांना मिळणार जागतिक बँकेचे अर्थसहाय्य

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  जागतिक बँकेकडून महाराष्ट्रातील महाविद्यालयांना आर्थिक मदत होणार आहे. हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. जागतिक बँक अर्थसहाय्यित तंत्रशिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा या प्रकल्पाद्वारे हा निधी मिळणार आहे. या अनुदानाचा उपयोग करून शैक्षणिक दर्जावाढ करण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून 4 हजार 200 कोटी निधी मिळणार आहे. प्रकल्प कालावधी 5 वर्षे आहे. प्रकल्पात निवड झालेल्या प्रत्येक पदवी संस्थेला 10 कोटी, तर पदविका संस्थेला प्रत्येकी 5 कोटी रुपये अनुदान केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारकडून जागतिक बँक अर्थसहाय्यित तंत्रशिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्राची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी देशातील साधारणत: 150 ते 175 पदवी संस्था आणि 100 पदविका संस्थांची निवड करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून राज्यातील शेकडो उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांना यामुळे मदत मिळणार आहे. मात्र, त्यासाठी विविध प्रकारच्या आंतरबहुविद्याशाखीय पद्धतीचे अभ्यासक्रम आणि त्याबद्दल पायाभूत सुविधा आणि सुधारणा या उच्च शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थांनी करणे अभिप्रेत आहे.

गुणवत्तावाढीला चालना

यामध्ये संस्थांमधील प्रयोगशाळा, वर्गकक्ष आणि इतर शैक्षणिक सोयीसुविधांचे आधुनिकीकरण, अभ्यासक्रमात सुधारणा, डिजिटायझेशन, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, संशोधनास चालना, नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणे व विद्यमान सेंटर ऑफ एक्सलन्सचे बळकटीकरण, इनोव्हेशनला आणि पेटंटस्ला प्रोत्साहन, संस्थांमध्ये प्रशासकीय सुधारणा म्हणजे व्यवस्थापन मंडळाची स्थापना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, शिक्षकवर्गाचे प्रशिक्षण, बहुशाखीय अभ्यासक्रम सुरू करण्यास अनुदान या बाबींसाठी अनुदान मिळणार आहे.

Back to top button