ठाकरे गटाने केली ओळखपरेडची मागणी | पुढारी

ठाकरे गटाने केली ओळखपरेडची मागणी

नवी दिल्ली/मुंबई; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना कोणाची? यावर निवडणूक आयोगासमोर असलेल्या दाव्यांची सुनावणी पुन्हा 20 जानेवारीपर्यंत लांबली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेना ठाकरे गटाचीच असल्याचा युक्तिवाद करीत अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांत त्रुटी असल्याचे सांगत, ठाकरे गटाने सादर केलेल्या शपथपत्रांतील कुणाचीही ओळखपरेड घ्या, अशी मागणी केली.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हासंबंधी निर्णय देण्यासाठी घाई करू नये, अशी विनंतीही ठाकरे गटाने केली. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर दावा करीत शिवसेनेचे ठाकरे गट व शिंदे गट दिल्लीत झुंजत आहेत. निवडणूक आयोगासमोर या दाव्यांची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाचे वकील अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तिवाद केले. सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई उपस्थित होते.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर मंगळवारी सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती, त्यावर मात्र आयोगाने काही निर्देश दिले नाहीत.

कपिल सिब्बल यांचा दावा

शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना आहे. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये, असे सांगत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी केला.

घाईघाईत निकाल न देण्याची मागणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हासंबंधी निर्णय देण्यासाठी घाई करू नये, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत थांबावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

ओळखपरेडची मागणी

आपल्याकडून 23 लाख कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून, त्यामधील कोणत्याही व्यक्तीला निवडणूक आयोगाने बोलवावे आणि त्याची ओळखपरेड, छाननी करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

त्रुटी नसल्याचा शिंदे गटाचा दावा

निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून 23 लाख कागदपत्रे, तर शिंदे गटाकडून चार लाख कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. त्यावर ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, असा दावा केला होता. तो खोडून काढताना शिंदे गटाचे वकील अ‍ॅड. जेठमलानी यांनी त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच या आधीच्या काही सुनावणींचा दाखला शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला.

Back to top button