कोकणात सरळ, तर इतरत्र बहुरंगी लढत | पुढारी

कोकणात सरळ, तर इतरत्र बहुरंगी लढत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : येत्या 30 जानेवारीला होऊ घेतलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी पाचही मतदारसंघांत मिळून 27 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असून उर्वरित चार मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे.

काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. येथे सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. मात्र तांबे यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये शुभांगी पाटील आणि अ‍ॅड. सुभाष जंगले यांचाही समावेश आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात 8, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात 14, नागपूर शिक्षकमध्ये 22, नाशिक 4 तर अमरावती पदवीधर मतदारसंघात एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

औरंगाबाद, नागपूरमध्ये राष्ट्रवादीत बंडखोरी

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकजूट करून एकास एक उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न होते. मात्र औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केली आहे. सोळुंके यांनी माघार न घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांची हकालपट्टीची केली आहे, तर नागपूर शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे सतीश इटकेलवार यांनी बंडखोरी करीत आघाडीच्या उमेदवाराला आव्हान दिल्याने राष्ट्रवादीला इटकेलवार यांच्यावरही कारवाई करावी लागली.

वेणुनाथ कडूंची उमेदवारी मागे

दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप प्रणीत शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची उमेदवारी मागे घेण्यात भाजपला यश आले.

…तर तांबे भाजपचे उमेदवार : महाजन

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलिकडे त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. आपण भाजपकडेही पाठिंबा मागणार आहोत. असे वक्तव्य त्यांनी चार दिवसांपूर्वीच केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदिल दाखवल्यास सत्यजित तांबे भाजपचे उमेदवार असू शकतात, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान सत्यजित यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा मागणार नाही याचा पुनरुच्चार केला आहे.

Back to top button