मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाची (एनसीबी) ने ड्रग्ज तस्करांविरोधात मोहिमा उघडणे सुरू केले आहे. एनसीबीने मुंबई आणि गोवा येथे केलेल्या दोन धडक कारवाईत चार ड्रग्ज तस्करांना अटक केली. एनसीबीने यापैकी एका कारवाईत बॉलिवूडमधील अभिनेत्याच्या मेहुण्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणी तिसर्यांदा गोव्यातून अटक केली.
तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर गस्ती दरम्यान वरळी युनिटच्या अँटी नारकोटिक्स सेलने चिमा कॉलिन्स इजिओफार उर्फ मुसीली या 60 वर्षीय नायजेरियन नागरिकाला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 39 लाख रुपयांचे 130 ग्राम कोकेन जप्त केले.
एनसीबीने उत्तर गोव्यातील सिओलिम, ओम लॉन येथे 22 सप्टेंबर रोजी छापा टाकत छत्तीसगडमधील ड्रग्ज तस्कर नौमान सावेरी (22)ला ताब्यात घेतले होते. एनसीबीने त्याच्या जवळून 12 एलएसडी बॉटल्स आणि एमडीएमए/एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या. एनसीबीने पुढील तपासात हैद्राबाद येथील ड्रग्ज तस्कर सादिक अहमदसा (25) ताब्यात घेतले. नौमान आणि सादिक हे दोघे ड्रग्ज तस्कर गोव्यातील अंजुना येथील बार आणि रेस्टॉरंटचा मालक कुणाल शिंदेसाठी काम करत होते.
अखेर एनसीबीने याप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल करुन दाघांना अटक केली. एनसीबीने पुढे दक्षिण आफ्रिकेतील ड्रग्ज तस्कर आणि बॉलिवूड अभिनेत्याचा मेहुणा डेमेट्रीएड्स अॅगिसिलाओस याच्या उत्तर गोव्यातील चोपडेम घरातून चरस जप्त केले. याप्रकरणी त्यालाही अटक झाली आहे.
डेमेट्रीएड्स अॅगिसिलाओस हा अभिनेता अर्जून रामपाल याचा मेहूणा आहे. एनसीबीने गोव्यातील नागोआ चौक येथे सापळा रचून उल्हासनगरमधील रहिवासी मयूर मोहनानी उर्फ अमित (22) या ड्रग्ज तस्कराला एमडीएमए/एक्स्टसी गोळ्यांसह ताब्यात घेतले. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करुन मोहनानीला अटक झाल्याचे एनसीबीने सांगितले.
नायजेरियन ड्रग्ज तस्कराला मुद्देमालासह अटक
शुक्रवारी ताडदेव परिसरात वरळी युनिटचे अधिकारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना मुंबई सेंट्रल रेल्वे ब्रिजवळील महाराष्ट्र शासन एनर्जी सेंटरजवळ नायजेरीयन नागरिक ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण, सुदर्शन चव्हाण, अमोल कोळेकर, रविंद्र सावंत, शैलेश देसाई, दिलीप जगदाळे, राजेश चव्हाण, हनुमंत येगडे, हरिश राठोड, आकाश शेलार, दत्ताराम माळी साध्या वेशात पाळत ठेवून बसले. मुसीलीची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे 39 लाख रुपयांचे 130 ग्रॅम कोकेन सापडले.
मुसीली हा दिल्ली येथून मुंबईत आला होता. त्याने नवी मुंबईतील खारघर परिसरातून कोकेन घेतले होते. त्याची विक्री करण्यासाठी तो ताडदेव परिसरात आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मुसीली हा ड्रग्ज विक्री करणार्या टोळीमधील एक सदस्य असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.