भोगीची भाजी अधिक चविष्ट करण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स | पुढारी

भोगीची भाजी अधिक चविष्ट करण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : मकरसंक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायण, पूर्व-उत्तर प्रदेशात खिचडी आणि दक्षिण भारतात पोंगल म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदिल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. यादिवशी विशिष्ट अशी भोगीची भाजी केली जाते.

हिवाळ्यातील भाज्या आणि काही पारंपारिक मसाल्यांच्या मिश्रणाने तयार केलेला खाद्यपदार्थ म्हणजे भोगीची भाजी. ज्यामध्ये सर्व भाज्यांच्या एकत्रित मिश्रणामुळे अनोख्या चवीची एक वेगळीच भाजी बनवली जाते, त्याला भोगीची भाजी म्हणतात. भोगीची भाजी चविष्ट बनवण्यासाठी त्याची रेसिपी व या काही खास टिप्स…

भोगीची भाजी

भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

पावट्याच्या (वरण्याच्या) शेंगा, घेवड्याच्या शेंगा, ओला हरभरा, शेवग्याच्या शेंगा, वांगी, चाकवत, ओला वाटाणा, बारीक चिरलेला कांदा व ओल्या कांद्याची पात, शेंगदाणे, गाजर, लसूण पात, तीळ व तीळाचे कूट, सुक्या खोबऱ्याचं कूट, जिरे, कडीपत्ता तिखट मीठ, लसूण, तेल व पाणी.

कृती :

एका भांड्यात तेल गरम करुन त्यात जिरे, कडीपत्ता, लसूण पात, वाटलेला लसूण, घालून परतून घ्या. त्यानंतर त्यात कांदा व कांद्याची पात घालून परतून घ्या. कांदा भाजून झाल्यावर त्यात चवीनुसार तिखट व मीठ घाला. त्यानंतर पावट्याचे दाणे, घेवड्याचे दाणे, घेवड्याच्या शेंगा, चिरलेले गाजर, भिजवलेले शेंगदाणे, चिरलेली वांगी, ओला वाटाणा, चाकवत, शेवग्याच्या शेंगा,ओला हरभरा या सर्व भाज्या घालून एकसारखे भाजून घ्या. गरम पाणी व चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या. सर्व भाज्या शिजत आल्यावर त्यात तीळाचे कूट, शेंगदाण्याचे कूट, व सुक्या खोबऱ्याचे कूट घालून मंद आचेवर शिजू द्या. कोथिंबीर घालून गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करा.

chikki

काही खास टिप्स :

  • घेवड्याच्या शेंगा, पावट्याचे दाणे, घेवड्याचे दाणे, आधी भाजून घेतल्यास भाजी अधिक रूचकर लागते.
  • खोबरे, तीळ, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करावे.
  • तीळाचे व खोबऱ्याचे कूट करताना त्यात पाणी घालू नये. पाणी न घालता कूट केल्याने चांगला कट येतो.
  • शेंगदाणे तीन ते चार तास आधी भिजवावेत.

हेही वाचा

Back to top button