Menopause : महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे वय होतेय कमी | पुढारी

Menopause : महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे वय होतेय कमी

सातारा : मीना शिंदे; धावपळ, व्यस्त वेळापत्रक, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. तारुण्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या ऋतुचक्रामध्येही बदल होत आहे. मानसिक ताण- तणाव व त्यामुळे होणारी भावनिक ओढाताण याचा महिलांच्या मासिक पाळीव परिणाम होत असून रजोनिवृत्तीचे वय कमी होवू लागले आहे. पूर्वी वयाच्या ४५ वर्षांपासून ५५ वर्षांपर्यंत कालावधीत रजोनिवृत्ती (Menopause) होत असे. मात्र आता हा काळ ४० ते ५०च्या दरम्यान म्हणजेच अलीकडे आला आहे. परिणामी वार्धक्याचा कालावधीही वाढू लागल्याचे दाहक वास्तव समोर येत आहे.

महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहिले तरच त्या कुटुंबाचेही आरोग्य अवलंबून असते. प्रत्येक महिलेसाठी मोनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नसून निसर्गचक्राचा एक भाग आहे. परंतु हार्मोनल असंतुलनासह ताण-तणावामुळे रजोनिवृत्ती लवकर होत असून वार्धक्याच्या परिणामांना लवकर सामोरे जावे लागत आहे. विज्ञानाने मानवी आयुष्य वाढले असले तरी तारुण्याचा उत्साह कायम राखणे हे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे निसर्गचक्र विस्कळीत होवू न देणाऱ्या दिनचर्येवर भर देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांकडून देण्यात येत आहे.

Menopause : रजोनिवृत्तीची (मेनोपॉज) लक्षणे

रजोनिवृत्तीची शरीरांतर्गत प्रक्रिया तीन ते चार वर्षांपासून सुरु होते. यामध्ये महिन्याची महिन्याला पाळी न येणे, आलीच तर रक्तस्त्राव कमी किंवा खूप जास्त होणे, औदासिन्य, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणे ही मानसिक लक्षणे दिसतात. शारीरिक लक्षणांमध्ये अंग एकदम गरम किंवा थंड पडणे, घाम सुटणे, गरम थंड हवा सहन न होणे, डोकेदुखी, छातीत धडधडणे, झोप न लागणे, तसेच हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चेहऱ्यावर लव येणं, त्वचेची कांती कमी होवून सुरकुत्या पडणे, केस पातळ होणे, वजन वाढणे आदि लक्षणे दिसत वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.

रजोनिवृत्ती अलीकडे येण्याची कारणे

सामाजिक, भावनिक आणि आरोग्यविषयक घटना व परिस्थितीमुळे हल्ली मुलींना कमी वयातच मासिकचक्र सुरु होते. पूर्वी वयाच्या १४ ते १६ वर्षांचा कालावधी आता ११ ते १३ वर्षापर्यंत आला आहे. त्यामुळे ती लवकर जाते. तसेच वाढत्या वयातील विवाहामुळे गर्भधारणेसाठी इन्फर्टिलीटी ट्रीटमेंट घ्यावी लागते. हार्मोनल इनबॅलन्स होतो. त्यामध्ये बीज तयार होण्याची प्रक्रिया फास्ट झाल्याने पुढे बीज निर्मितीची क्षमता मंदावते. काही औषधोपचारांचा दुष्परिणाम तसेच करिअर व जबाबदाऱ्यांमुळे ताण-तणाव वाढल्याने कमी वयात रजोनिवृत्ती येत असल्याचे स्त्री रोग तज्ञांचे मत आहे.

रजोनिवृत्ती ही नैसर्गिक आहे. मात्र निसर्ग चक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे हा कालावधी कमी झाल्याने इतर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. अकाली वार्धक्य टाळण्यासाठी महिलांनी दिनक्रम, आहार व व्यायाम यात सुसुत्रता राखावी. लहानपणापसूनच जंकफूड टाळून प्रोटिनयुक्त सकस आहार घ्यावा. निसर्गचक्र खंडित न करता योग्य वेळेत लग्न, योग्य पालकत्व गरजेचे आहे. तणावमुक्त दिनचर्येला प्राधान्य द्यावे. – डॉ. स्मीता कासार, स्त्रीरोगतज्ञ.

हेही वाचा

Back to top button