विधानसभेतून : ‘बात निकलेगी तो दूर तलक जाएगी…! | पुढारी

विधानसभेतून : 'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी...!

राजेंद्र उट्टलवार; नागपूर वृत्तसेवा : नागपूरचे हिवाळी अधिवेशन टीका, टोमणे, आरोप-प्रत्यारोप, सरकारमधील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांना सरकारकडून मिळालेली क्लीन चीट, सभागृहाबाहेरील लक्षवेधी आंदोलन अन् विदर्भाच्या प्रश्नावर फारशी चर्चा न झालेले अधिवेशन ठरले. पहिला आठवडा गोंधळात गेल्यानंतर दुसऱ्या आठवडयात विक्रमी कामही करण्यात आले. अधिवेशनाचे सूप वाजताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. आमचाच झेंडा आणि आमचाच अजेंडा आहे. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी…!

विधानसभेतून लवकरच काही लोक कारागृहात दिसतील

आम्ही सूडबुद्धीने वागत नाही पण लवकरच काही लोक कारागृहात दिसतील! असा इशाराही त्यांनी दिला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही सोडले नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना आता यातून बाहेर पडायला हवे. राज्याचे प्रमुख म्हणून काम करा, असा सल्ला दिला. भाईंनी समृद्ध महाराष्ट्रासाठी घातलेली साद आणि दादांनी चांगल्या कामासाठी दिलेली सहकार्याची दाद ही शेवटच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. शेवटच्या दिवसातही प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, औचित्य मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चा असे भरपूर कामकाज झाले. समाजहिताचे अनेक मुद्दे नव्या-जुन्या सदस्यांनी पोटतिडकीने मांडले. मात्र, आपणही जनतेचे प्रश्न मांडले अशी औपचारिकता यात अनेकदा दिसली.

मग मंत्री बेपत्ता का? 

सभागृहाबाहेर विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात न घेता अध्यक्षविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने काँग्रेस शिवसेनेने वातावरण तापवले असल्याने का होईना अनेकांना गावाकडे परतण्याची घाई असताना बोलण्याची संधी दिली गेली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना खूप कामे असतात, आम्हाला काहीच काम नसताना सकाळ ते रात्री उशिरापर्यंत बसतो, मग मंत्री बेपत्ता का, 30 वर्षात असे पाहिले नाही, असा परखड सवाल करीत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला दोन-तीनदा धारेवर धरले. अखेरीस कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभूराज देसाई, गिरीश महाजन, चंद्रकातदादा पाटील तर कधी संदिपान भुमरे यांना सभागृहातच थांबावे लागले.
हे ही वाचा :

Back to top button