भारत वि. बांगला देश आज तिसरा वन-डे सामना; दुखापतीमुळे अनेक खेळाडू बाहेर | पुढारी

भारत वि. बांगला देश आज तिसरा वन-डे सामना; दुखापतीमुळे अनेक खेळाडू बाहेर

चितगाव; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगला देशविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल केले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतींमुळे तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. कुलदीप तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात खेळू शकतो.

उद्या उभय संघांमध्ये तिसरा आणि शेवटचा सामना होईल. या मालिकेत भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये हातातोंडाशी आलेला विजय भारताला मिळवण्यात अपयश आले. आता या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी संघात बदल करण्यात आला आहे.

बीसीसीआयनेही रोहित शर्माच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितला दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला होता. असे असतानाही रोहित दुसर्‍या डावात फलंदाजीला आला. बोर्डाने सांगितले, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आणि ढाका येथील स्थानिक रुग्णालयात त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी तो मुंबईला रवाना झाला असून अंतिम एकदिवसीय सामन्याला तो मुकणार आहे. कसोटी मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत नंतर निर्णय घेतला जाईल.

वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर पाठदुखीची तक्रार केली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आणि त्याला दुसर्‍या वन-डेपासून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. सहकारी वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात डाव्या हाताच्या दुखापतीचा त्रास झाला आणि तो मालिकेतूनही बाहेर पडला.

Back to top button