लवंगी मिरची : सुस्त यंत्रणा | पुढारी

लवंगी मिरची : सुस्त यंत्रणा

आज चेहरा असा का उतरलेला दिसतोय राव?
चिंता लागून राहिली आहे.
कोणाची?
नातवाची. गेले काही दिवस बरं वाटत नव्हतंच त्याला. आता डॉक्टर म्हणताहेत, गोवर झालासा वाटतोय.
मुलांना गोवरकांजिण्या होतातच की कधी ना कधी, त्यांचं एवढं काय मनावर घ्यायचं?
ते नेहमीचं वेगळं, जीवघेण्या साथीनंतरचं वेगळं. आधीच प्रतिकारशक्ती गेलेली असते लोकांची.
तुमच्या नातवाचं लसीकरण नीट झालंय का?
असेल बहुतेक. आम्ही आजी-आजोबा इकडे दूर पडतो, तिकडे नातवंडांचे आई-बाप कामात गढलेले.
नेमक्या वेळेला नेमक्या ठिकाणी आपल्या पोराच्या औषधासाठी, लस टोचण्यासाठी पोहोचतात की नाही, काय माहीत?
भले! पोटच्या पोराच्या प्रकृतीपेक्षा कोणतं काम मोठं पडतं ह्या लोकांना?
तसं नाही अगदी; पण खूपदा त्यांना ह्या बाबतीत जागं करावं लागतं. डोसची वेळ झाली, लस टोचायचा टाईम आला, असं काहीबाही ध्यानात आणून द्यावं लागतं.
सरकारही आणतंच की, अशी जाग. कोव्हिडच्या काळात कितीदा आपल्याला यायचे असे मेसेज की, बुवा, लस घेतली का? तुमचा अमूक केंद्रावर नंबर लागलाय. मोफत लस मिळण्याची ठिकाणं नोंदवा. वगैरे, वगैरे.
यायचे खरे असे मेसेस; पण केव्हा? कोव्हिडच्या काळात. भीषण साथीशी दोन हात करायचे होते म्हणून. साथ सरली की काय होतं?
एवढा मोठा देश आपला! सगळ्यांना सर्वकाळ उच्च दर्जाची सेवा पुरवणं ही चेष्टा नसणार.
नसतेच. म्हणून तर अनेकदा सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर्स नसतात, औषधांची टंचाई असते.
आतली फ्रीमधली औषधं बाहेर काळ्या बाजारात विकली गेली की दुसरं काय होणार?
तो लोकांचा उपद्व्याप वेगळा. सरकारच्या बाजूने काय होतं? फक्त नाक दाबलं की, तोंड उघडतं. जरा कुठे कोव्हिड गेला असं वाटलं आणि आपली आरोग्यसेवा ढेपाळली.
ढेपाळली असं एकदम म्हणू नका हो, आता तर भारी टास्क फोर्सही नेमलाय. गोवरचे हॉट स्पॉट शोधणं चाललंय. वेगवेगळ्या पाहण्या सुरू आहेत; पण ह्याआधीच ज्या लागणी झाल्या असतील, त्यांचं काय? बैल गेला आणि झोपा केला, तसं तर होत नसेल सरकारच्या हातून?
सगळी आरोग्यसेवाच आजारी पडल्यासारखं बोलू नका हो. प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे!
तेच. फक्त ते बारमाहीचे असावेत, आरोग्यसेवा ही कधीही हंगामी तरतूद नसावी, तो सततचा ध्यास असला पाहिजे हे सरकारला कळेल, तो सुदिन.
सरकारला कळेल हो; पण त्याची अंमलबजावणी खालच्या लोकांनाच करावी लागते.
तेही खरंय म्हणा. खालच्या लोकांनी रुग्णांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात.
बर्‍याच वेळा या लोकांचा अधिक त्रास होतो.
होय. भीक नको, पण कुत्रं आवर, अशी म्हणायची वेळ येते आपल्यावर!
अनेकवेळा आजारांच्या संसर्गावेळी सामान्य माणसाची भंबेरी उडत असते!
नक्कीच, अशा वेळी आपल्या आरोग्य यंत्रणेने आपली जबाबदारी ओळखायला हवी!
असे झाले तर लोकांमध्ये आरोग्य यंत्रणेबाबत आत्मियता निर्माण होईल. त्यांनी जबाबदारी पार पाडल्यास आरोग्याचे प्रश्न मिटतील.

– झटका

Back to top button