औरंगाबाद : दहावी-बारावीचे अंतर्गत गुण चाचणीतील मूल्यांकनाच्याच आधारे निश्चित करा; शिक्षण विभागाची सूचना | पुढारी

औरंगाबाद : दहावी-बारावीचे अंतर्गत गुण चाचणीतील मूल्यांकनाच्याच आधारे निश्चित करा; शिक्षण विभागाची सूचना

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान पाहता, त्यांचा अधिकाधिक सराव होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी नियमित शाळेत यायला हवेत. यासाठी दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या तीन चाचण्या घ्या. त्यातील दोन चाचण्यांच्या मूल्यांकनाच्या आधारावर अंतर्गत गुण देऊन ते बोर्डाला देण्यात यावेत, अशी माहिती गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना शुक्रवारी आयोजित कार्यशाळेत देण्यात आली.

दोन वर्षांत मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले असून, त्यांचा लेखनाचा सराव राहिलेला नाही. शिवाय पूर्ण वेळ शाळेत बसण्याचा कंटाळा येणे, लवकर कंटाळवाणे वाटणे, अभ्यासात मन न रमणे असे प्रकार समोर येत आहेत. यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात घेता, शुक्रवारी शहरातील संत एकनाथ रंग मंदिरात शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, आ. विक्रम काळे यांच्यासह शिक्षण विभागातील इतर अधिकारी आणि विषयतज्ज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेत अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थी क्षमता वाढविणे, गुणवत्ता, मूल्यमापन आणि दैनंदिन पाठ शाळेने कसे घ्यावेत, याविषयीची माहिती देण्यात आली. यावेळी दहावी-बारावीसाठी कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येतात. ते गुण आता या तीन सराव परीक्षांच्या मूल्यांकनाच्या आधारावर देऊन बोर्डाला कळवावेत, अशा सूचना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांना देण्यात आल्या.

हेही वाचा 

Back to top button