Vande Bharat Express : २०२५ पर्यंत टिल्टिंग तंत्रज्ञानाच्या १०० वंदे भारत एक्स्प्रेस | पुढारी

Vande Bharat Express : २०२५ पर्यंत टिल्टिंग तंत्रज्ञानाच्या १०० वंदे भारत एक्स्प्रेस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मेक इन इंडिया अंतर्गत आधुनिक वंदे भारत (Vande Bharat Express) प्रवाशांच्या सेवेत धावू लागल्या आहेत. त्यानंतर आता देशात २०२५पर्यंत टिल्टिंग तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या सुमारे १०० वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. भारतीय रेल्वेत गेल्या काही वर्षांत मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय रेल्वेने लक्षणीय प्रगती केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे तर भारतीय रेल्वेमध्ये उल्लेखनीय बदल झाला आहे.

आता केंद्र सरकार लवकरच वंदे भारत एक स्प्रेसच्या रुपात ‘टिल्टिंग रेल्वे’ आणणार आहे. हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी रेल्वे लवकरच करार करणार आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत साधारण १०० वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये या टिल्टिंग तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे. फायदा काय? सामान्य रेल्वे जेव्हा वळण घेते तेव्हा रेल्वेमध्ये बसलेले प्रवासी एका बाजूने ओढले जातात. तर उभे राहिलेल्या प्रवाशांचा तोल जातो. मात्र टिल्टिंग ट्रेनमध्ये प्रवाशांना ही अडचण जाणवत नाही. टिल्टिंग ट्रेनमध्ये मोशन कंट्रोल टेक्नॉलॉजी असते. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून अधिक वेगाने धावण्यास मदत होते.

Vande Bharat Express : आतापर्यंतचे प्रयत्न

• भारतीय रेल्वेने ‘टिल्टिंग रेल्वे’ तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला होता. २०१७ साली टिल्टिंग रेल्वे विकसित करण्यासाठी स्वित्झर्लंड देशाशी करार केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत तंत्रज्ञानविषयक सहकार्य करण्यासाठी हा करार झाला होता.

कोणकोणत्या देशांत टिल्टिंग रेल्वे

•• इटली, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, फिनलंड, रशिया, रोमानिया, युके, स्वित्झर्लंड, चीन, जर्मनी या देशांमधील रेल्वेमध्ये टिल्टिंग तंत्रज्ञान आहे. अमेरिकेत २००२ सालीच टिल्टिंग रेल्वे सुरू झाली आहे. विरजिन ट्रेन्स या कंपनीद्वारे या रेल्वे चालवल्या जातात.

हेही वाचा 

Back to top button